सीटीएस प्रणालीमुळे अडकले कोट्यवधींचे धनादेश
By admin | Published: May 7, 2014 01:30 AM2014-05-07T01:30:36+5:302014-05-07T02:28:58+5:30
शहरातील सर्व प्रमुख बॅँकांमध्ये क्लिअरिंगसाठी आलेले धनादेश दोन दिवसांपासून अडकल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे समजते.
नाशिक : रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने देशातील सर्व प्रमुख महानगरांमधील बॅँकांना चेक ट्रन्केशन सिस्टीम (सीटीएस) ३० एप्रिलपासून लागू करण्याचे आदेश दिल्याने शहरातील सर्व प्रमुख बॅँकांमध्ये क्लिअरिंगसाठी आलेले धनादेश दोन दिवसांपासून अडकल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे समजते.
एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शहरातील २६ शाखांपैकी प्रमुख चार ते पाच शाखांमध्ये दोन दिवसांत चार कोटी रुपयांचे धनादेश अडकल्याचे कळते. सद्यस्थितीत स्टेट बॅँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा, आयडीबीआय व एस बॅँक या बॅँकांमध्येच ही सीटीएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. अन्य बॅँकांना या बॅँकांकडून सेवा घेण्यासाठी शुल्क अदा करूनच ही सेवा घ्यावी लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील मुख्य शाखेत, जिल्हा परिषदेसमोेरील शाखेत तसेच पंचवटी व अन्य दोन अशा चार ते पाच शाखांमध्ये दररोज सुमारे दोेन कोटींची उलाढाल होते. गेल्या दोन दिवसांपासून सीटीएस प्रणाली लागू करण्याचे काम सुरू असल्याने जिल्हा बॅँकेच्या या प्रमुख शाखांमध्ये सुमारे चार कोटींहून अधिक रकमेचे धनादेश क्लिअरिंगसाठी अडकल्याचे समजते. बुधवारी दुपारपर्यंत किंवा फार फार तर गुरुवारपर्यंत ही अडचण सोडविली जाणार असल्याचे जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी सांगितले. या प्रणालीमुळे ग्राहकांना अवघ्या काही मिनिटांत त्यांचे धनादेश वटण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. बॅँकेच्या ग्राहकांसाठी रिझर्व्ह बॅँकेची ही सुविधा खूपच फायदेशीर असल्याचे बॅँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. प्रमुख महानगरांतील सर्वच बॅँकांना एनपीसीआय (मुंबई) या संस्थेचे सभासद झाल्यानंतरच ही सुविधा मिळणार असून, येत्या काही तासांत जिल्हा बॅँकेलाही सभासद सुविधा मिळून अडचण दूर होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)