निवडणुका संपल्या की दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?; जयंत पाटील यांचा अर्थमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:12 PM2021-05-12T12:12:36+5:302021-05-12T12:15:11+5:30
Petrol Diesel Price Hike : पेट्रोल - डिझेल दरवाढीवर जयंत पाटील यांनी अर्थमंत्र्यांवर साधला निशाणा
पाच विधानसभांच्या आणि पोटनिवडणुकांचे निकाल नुकतेच लागले. या निकालानंतर देशात पुन्हा एकदा पेट्रोलडिझेलची दरवाढ सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. "निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच ! हे काय वित्त नियोजन आहे का?," असा सवाल पाटील यांनी केला आहे. कोरोना परिस्थितीत देशात व राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९२.०५ रुपये आणि डिझेलची किंमत ८२.६१ रुपये प्रति लिटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल १००.७५ पैसे, तसेच डिझेलही ९०.६८ रुपये दराने विक्री केली जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ८९.७५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
"केंद्रीय अर्थ मंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवल्या जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच ! हे काय नियोजन आहे यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा," हवं असं जयंत पाटील म्हणाले.