आरोग्य राज्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रसाद अनेकांना दिला; जयंत पाटील यांची कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 07:42 AM2020-09-21T07:42:21+5:302020-09-21T07:45:10+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही लोक काळजी घेत नाहीत, असे सांगताना जयंत पाटील यांनी यड्रावकर-पाटील यांचेच उदाहरण दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कोरोना होऊन गेल्याचे कळलेही नाही. त्यांनी अनेकांना प्रसाद दिला असेल, अशी कोपरखळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मारली. सांगलीत दक्षिण भारत जैन सभेतर्फे सुरू केलेल्या कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वत: राज्यमंत्री यड्रावकर-पाटील या वेळी उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही लोक काळजी घेत नाहीत, असे सांगताना जयंत पाटील यांनी यड्रावकर-पाटील यांचेच उदाहरण दिले. ते म्हणाले, आरोग्य राज्यमंत्र्यांना कोरोना होऊनदेखील गेला, पण त्यांना कळालेच नाही. त्यांच्या स्वीय सहायकाला, वाहनाच्या चालकालाही कोरोनाचा संसर्ग झाला. पण समजलेच नाही. यादरम्यान त्यांनी अनेकांना प्रसाद वाटला असेल.
या त्यांच्या टिप्पणीला खुद्द यड्रावकर-पाटील यांनीही हसून दाद दिली. यड्रावकर-पाटील म्हणाले, कोरोनाविरोधात लढ्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी डॉक्टर व प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.
दक्षिण भारत जैन सभा यांच्या वतीने सांगली शहरातील चोपडे मेमोरियल हॉस्पिटल येथे कोविड हॉस्पिटल उभारले आहे त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटक आज पुढे येऊन मदत करत आहे याचे समाधान वाटते. दक्षिण भारत जैन सभेचे आभार🙏 pic.twitter.com/ZzHQdFSNdF
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) September 20, 2020
कोरोना टाळायचा तर मास्कचा वापर, हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे, ही त्रिसूत्री पाळायलाच हवी. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील नियमांचे काटेकोर पालन करतात. अंतर राखून संवाद साधतात. त्यामुळे तुम्ही-आम्हीदेखील हे पथ्य पाळायलाच हवे. नेत्यांना कडेवर घ्यायची सवय बंद करायला हवी.
जयंत पाटील, जलसंपदामंत्री