Coronavirus: पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी? जिल्ह्यात ३ मंत्री पण एकही मदतीसाठी पुढं आला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:18 AM2021-04-19T04:18:54+5:302021-04-19T09:37:21+5:30
बहुतांश आमदार मात्र सरकारी यंत्रणेवर अवलंबून असून, त्यांनी स्वत:ची अशी यंत्रणा मतदारसंघात उभी केली नाही. यापुढील काळात त्यांनी सुविधा उभ्या कराव्यात, अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे.
अहमदनगर : कोरोनाच्या महामारीने वाड्या वस्त्यांवरील जनता होरपळून निघाली आहे. सुविधा नसल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली. सगळीकडे अभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यांच्या कारभाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेमार्फत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. पण, ही यंत्रणा आता कमी पडू लागल्याने काही आमदारांनी स्वत:ची आरोग्य यंत्रणा उभी केली. परंतु, बहुतांश आमदारांनी साधे कोविड सेंटरही सुरू न केल्याने जनतेतून रोष व्यक्त होताना दिसत आहे.
कोरोनाने जिल्हाभर कहर माजविला आहे. ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. वेळेवर उपचार न मिळणे हे या मागील एक कारण आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत. खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. या भीतीने अनेक रुग्ण घरात बसलेत. यामुळे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. आई सरकारी रुग्णालयात, वडील खासगीत, तर मुलगा कोविड केअर सेंटरमध्ये अशी अनेक कुटुंबांची वाताहात झाली आहे. कुणाची प्रकृती कशी आहे, हे समजायला मार्ग नाही. ही वस्तुस्थिती आहे. कुणाला बेड मिळत नाही. कुणाकडे उपचारासाठी पैसे नाहीत. कुणाला इंजेक्शन हवे असते. त्यांना लोकप्रतिनिधींकडून मोठी अपेक्षा आहे. परंतु, तालुक्याचे कारभारी सरकारी यंत्रणेवर अवलंबून आहेत. सूचना बैठका,आढावा, आदेश दिले झाले सर्व, अशीच काही त्यांची भावना झालेली दिसते. काही त्यास अपवाद आहे. पारनेरचे नीलेश लंके, कर्जत- जामखेडचे रोहित पवार, अकोल्याचे किरण लहामटे, नगरचे संग्राम जगताप, श्रीरामपूरचे लहू कानडे हे आमदार कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढे आले. त्यांनी आपापल्या मतदारसंघात कोविड सेंटर उभे करून गोरगरिबांना मदतीचा आधार दिला. पारनेरच आमदार नीलेश लंके यांनी तर एक हजार बेडचे सेंट उभारले आहे. आमदार रोहित पवार यांनी कर्जतमध्ये ३५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. अकोल्याचे आमदार लहामेटे यांनी आगस्ती मंदिरात कोविड केअर सेंटर सुरू केले. आमदार कानडे यांनी श्रीरामपूर ग्रामीण आरोग्य केंद्राला ३० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. अशा संकट काळात या आमदारांनी मदतीचा हात पुढे केला. बहुतांश आमदार मात्र सरकारी यंत्रणेवर अवलंबून असून, त्यांनी स्वत:ची अशी यंत्रणा मतदारसंघात उभी केली नाही. यापुढील काळात त्यांनी सुविधा उभ्या कराव्यात, अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे.
पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी
आपल्या मतदारसंघात आरोग्य सुविधांची काय परिस्थिती आहे, हे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना माहीत असते. वेळोवेळी आढावा घेताना आरोग्य सुविधा हा एकमेव विषय बैठकांच्या पटलावर असतो. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आमदारांनी कोविड सेंटर सुरू करावे, अशा सूचना केल्या. अशा कठीण परिस्थितीत आमदारांनी सांगण्याची वेळ का यावी, असा ही प्रश्न आहेच.
मंत्र्यांच्या कोविड सेंटरचे दार अजून उघडले नाही
जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. या मंत्र्यांनी आपले कोविड केअर सेंटर अजून तरी सुरू केलेले नाही. आमच्या प्रतिनिधींनी माहिती घेतली असता नियोजन सुरू आहे, लवकरच सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे. पण, त्यासाठी रुग्णांना आणखी दिवस वाट पाहावी लागेल, हे मंत्र्यांनाच ठाऊक.
कोविड सेंटरला आमदारांचा फाटा
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचे नेतृत्व करतात. त्यांच्या मतदारसंघात थोरात यांनी अजून तरी कोविड सेंटर सुरू केलेले नाही. आमदार आशुतोष काळे हे कोपरगावचे नेतृत्व करतात, त्यांनी स्वत: कोविड केअर सेंटर सुरू केले नाही. नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे यांनी त्यांच्या राहुरी मतदारसंघात सेंटर सुरू केलेले नाही. आमदार राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या लोणी येेथे सेंटर सुरू केले आहे. जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांनीही त्यांच्या नेवासा तालुक्यात स्वत:चे कोविड केअर सेंटर सुरू केलेले नाही. आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यात सेंटर सुरू केलेले नाही. नगर तालुका श्रीगोंदा, राहुरी नगर आणि पारनेर या तीन मतदारसंघात विभागलेला आहे. तीन आमदार असून एकाही आमदाराने या तालुक्याचा साधा आढावादेखील घेतला नसल्याचे सांगण्यात आले.