अल्पवयीन मुलीला दोन लाखांत देहविक्रीस लावले, मातेसह दोघांना अटक
By admin | Published: July 27, 2016 08:22 PM2016-07-27T20:22:45+5:302016-07-27T20:22:45+5:30
स्वत:च्या अल्पवयीन मुलीला दोन लाखांच्या बदल्यात देहविक्र ीस भाग पाडणाऱ्या शालू महेंद्र गवई (४०) या मातेसह तिचा प्रियकर महेश शांताराम वऱ्हाडी (३९) या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २७ : स्वत:च्या अल्पवयीन मुलीला दोन लाखांच्या बदल्यात देहविक्र ीस भाग पाडणाऱ्या शालू महेंद्र गवई (४०) या मातेसह तिचा प्रियकर महेश शांताराम वऱ्हाडी (३९) या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली आहे. या कारवाईत १३ वर्षीय मुलीची सुटका केली असून तीन मोबाइल, एक कार आणि सात हजार ९५० ची रोकड असा तीन लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
आपल्या अल्पवयीन कुमारी मुलीबरोबर पहिल्यांदा शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तीन लाख रुपये देणाऱ्या ग्राहकाबरोबर शालू ही व्यवहार करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्याआधारे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राबोडीतील कॅसल मिल भागातील ‘स्वागत व्हेज अॅण्ड नॉनव्हेज हॉटेल’ राबोडी येथे सहायक पोलीस निरीक्षक के.ए. बर्गे, व्ही.पी. तेजाळे, उपनिरीक्षक शरद पंजे, जमादार आर.जे. महाले आणि हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने सापळा लावला. त्या ठिकाणी तिने पोलिसांनी पाठवलेल्या ग्राहकाकडे मुलीच्या बदल्यात तीन लाखांची मागणी केली. परंतु, सौदा दोन लाखांना पक्का झाला. त्यातील ५० हजार रुपये स्वीकारून ‘काम’ झाल्यानंतर उर्वरित दीड लाखाची रक्कम देण्याचे ठरले. तिने ५० हजार स्वीकारल्यानंतर या हॉटेलमध्ये तिला आणि तिचा प्रियकर महेश या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांनाही २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सरकारतर्फे राबोडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पंजे यांनी गुन्हा दाखल केला आहे