- कॅप्टन सुनील सुळेहजारो वर्षांपूर्वी नदीत वाहात जाणा-या ओेंडक्यावर पहिला आदिमानव चढून बसला तेव्हा जलप्रवासाला सुरुवात झाली खरी, पण समुद्रमार्गे प्रवास करण्याचं धाडस त्याच्या अंगात यायला आणखी बरीच सहस्रक जावी लागली. तरीही पाच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या इजिप्शियन, मेसापोटेमियन आणि सिंधू नदीच्या खोर्यातली मोहेंजोदडो-हडप्पा या तीनही संस्कृतींमध्ये नौवहनाला फार महत्त्वाचं स्थान होतं. त्यांचा प्रवास मुख्यतः नदीतून असला, तरी त्यांच्यामध्ये आपापसात समुद्रमार्गाने व्यापार होत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. या काळात किनारा नजरेआड झाला, तर आपण नक्की कुठे आहोत हे शोधण्याचं काम फार अवघड ठरत असे. त्यामुळे जे कोणी चुकून माकून खुल्या समुद्रात गेले, त्यातले बरेचसे परत आले नाहीत, त्यामुळे समुद्र पार करण्याने दुर्दैव ओढवतं, समुद्राच्या कडेपर्यंत गेलेल्या होड्या तिथून खाली पडतात अशी माहिती सर्वमान्य झाली आणि निदान अगदी अलिकडेपर्यंत, म्हणजे कोलंबसाच्या काळापर्यंत तरी अनेकांचा या गोष्टींवर विश्वास होता. त्याला कारणही तसंच होतं. समुद्रावरच्या वाटा कोणी आखून दिलेल्या नसतात, त्या ज्याच्या त्यानेच बनवायच्या असतात. समुद्राचा पृष्ठ्भाग एखाद्या कोर्या पाटीसारखा असतो, मग त्यावर मार्ग शोधायचा कसा? दर्यावर्दींना हजारो वर्षे सतावणारा हा प्रश्न आहे. सुरुवातीचे धाडसी दर्यावर्दी आपल्या होड्या समुद्रात झोकून द्यायचे, पण किनारा नजरेपलिकडे गेला तर काय अनर्थ होईल ते माहीत असल्यामुळे समुद्राच्या कडेकडेनं आपली होडी हाकारायचे. जरूर तेव्हा होडी किनार्याला आणून जवळच्या एखाद्या टेकाडावर चढून पलिकडे काय आहे हे पाहून पुढचा प्रवास सुरू व्हायचा. टेस्टिंग द वॉटर्स हा वाक्प्रचार त्यावरूनच आला असावा. याच काळात अनुभवी दर्यावर्दींनी आपापल्या उपयोगासाठी, आपण जाऊन आलेल्या भागाचे, जमतील तसे नकाशे बनवले. कोणी चामड्यावर तर कोणी कॅन्व्हासवर. हे बहुतांशी चित्रांच्या स्वरूपात असायचे. त्याला प्रमाण (स्केल), दिशा, अक्षांश, रेखांश यांची बंधने नसायची. या माहितीची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करता करता जगभरचे दर्यावर्दी हळूहळू अधिकाधिक ज्ञानी आणि धाडसी व्हायला लागले. दहाव्या किंवा अकराव्या शतकात चीनमधल्या कोण्याश्या गुराख्याने लोहचुंबकाचा दगड (लोडस्टोन) शोधून काढला. त्यामुळे चिनी आणि नंतर पोर्तुगीज दर्यावर्दी होकायंत्राचा उपयोग करायला लागले. (अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)आता दिवसादेखील उत्तर दिशा बर्यापैकी बिनचूकपणे ओळखता येऊ लागली; नाही तर रात्र होऊन पुरेसा अंधार पडल्यावर ध्रुवतारा दिसायला लागण्याची वाटा पाहात बसावे लागायचे. ध्रुवतारासुद्धा फक्त उत्तर गोलार्धातच दिसत असल्यामुळे विषुववृत्ताच्या दक्षिणेला भटकणारे याही सुखापासून वंचित होते. जवळपास त्याच सुमारास दक्षिण भारतात सम्राट राजेंद्र चोलाच्या आश्रयाने भारतीय जहाजे पूर्वेकडे इंडोनेशिया, जावा, सुमात्रा आणि त्याही पुढे जात होते. समुद्रातून मार्ग शोधण्यासाठी ते वेगवेगळ्या नक्षत्रांच्या आकाशातल्या स्थानांचा उपयोग करून घेत असत. ही सगळी माहिती जहाजाचा कर्णधार श्लोकांच्या स्वरुपात पाठ करून ठेवत असे, त्यामुळे जहाजावर बंड होऊन कर्णधाराला कोणी पाण्यात फेकून देण्याची भीती राहात नसे. भारताच्या पश्चिम किनार्यावरचे दर्यावर्दी अरबांबरोबर व्यवहार करण्यासाठी अरबी समुद्रातून प्रवास करीत. (येणारा काळ भारताचाच !)ध्रुवतारा ज्या उंचीवर असेल त्या अक्षांशावर आपण आहोत हे त्यांना माहीत होते. या कामी ते कमाल नावाची एक गाठी मारलेली दोरी वापरीत. यातली एकेक गाठ एकेका बंदराच्या अक्षांशाची असायची. दोरीच्या टोकाला तळहाताएवढी एक लाकडी फळी लावलेली असे. या फळीची खालची कड क्षितिजाला लावायची आणि वरची ध्रुव तार्याला. हे साधण्यासाठी ती फळी पुढेमागे करावी लागायची. हे काम ती गाठी मारलेली दोरी दातात धरून करीत. आपल्याला ज्या बंदराला जायचे असेल ती गाठ दातात येईपर्यंत उत्तरेला किंवा दक्षिणेला जात राहायचे. एकदा का योग्य अक्षांश सापडले की त्यावरून जात राहिल्याने जहाजाबरोबर हव्या त्या बंदराला पोहोचत असे. या पद्धतीला पॅरेलल लॅटिट्यूड सेलिंग म्हणत. युरोपियन दर्यावर्दी मात्र याच कामासाठी ऍस्ट्रोलोब नावाचे एक उपकरण वापरीत. हे वापरून ध्रुवतार्याची क्षितिजापासूनची उंची अंशांमध्ये मोजता येत असे. ऍस्ट्रोलेब म्हणजे एक पितळी नळी असे. या नळीतून ध्रुव तार्याकडे पाहण्यासाठी ती क्षितिजापासून किती अंश वर उचलावी लागते हे मोजण्यासाठी एक कोनमापक त्या नळीखाली बसवलेला असे. नंतर या ऍस्ट्रोलेबमध्ये सुधारणा होत होत पुढे सेक्स्टंट बनवण्यात आला. सेक्स्टंटमध्ये गॅलिलिओने सतराव्या शतकात शोधलेली दुर्बीण, आरसे आणि कोनमापक असतात. हे उपकरण आजही वापरात आहे. समुद्राच्या पृष्ठ्भागावर अंतर मोजणं हेही एक अव्हानच होतं. चहूकडे पाणीच पाणी असल्यावर अंतर मोजायचं तरी कसं? यावरही पंधराव्या शतकातल्या शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला. आधी विषुववृत्त ३६० अंशांमध्ये विभागलं. त्या प्रत्येक अंशाचे पुन्हा साठ भाग केले. हा भाग म्हणजेच नॉटिकल माइल किंवा सागरी मैल. याची लांबी असते ६०८० फूट किंवा १८५३ मीटर्स असते. आता या माहितीचा उपयोग करून जहाजाचा वेग काढायची एक पद्धत कोणी तरी शोधून काढली. एक लांब दोरी घेऊन तिला दर ५१ पुटांवर एक गाठ (नॉट) मारायची. तिच्या एका टोकाला एक लाकडाचा छोटासा ओंडका (लॉग) बांधायचा. वेग मोजायचा असेल तेव्हा हा ओंडका पाण्यात टाकायचा आणि तो दोरी बाहेर खेचून न्यायला लागला, की एका वाळूच्या घड्याळाने बरोब्बर अर्धं मिनिट मोजायचं आणि त्या अर्ध्या मिनिटात किती गाठी बाहेर जातात ते मोजायचं. अर्ध्या मिनिटात जितक्या गाठी बाहेर गेल्या तितके नॉट्स किंवा ताशी तितके सागरी मैल जहाजाचा वेग. जहाजाचा वेग हल्ली अतिशय प्रगत इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी मोजतात, पण त्या उपकरणाला आजही स्पीड लॉग असेच म्हणतात आणि वेगही नॉट्समध्येच मोजतात.तेव्हा अशारीतीने ज्याकाळात दर्यावर्दी मंडळी समुद्रावर पराक्रम गाजवत होती त्याच काळात शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ग्रहतार्यांच्या मदतीने समुद्रावरच्या वाटा शोधण्याचे नवनवे मार्ग शोधत होते. या बाबीत सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्कॉटिश गणितज्ञ जॉन नेपियरने केलेली कामगिरी केवळ अतुलनीय आहे. दर्यावर्दींचं गणिताचं ज्ञान यथतथाच असे. त्यांना पाच आकडी संख्यांचे गुणाकार भागाकार करायला सांगणं हे जरा जास्तच झालं असतं, ही जाण ठेवून नेपियरने लॉगॅरिदम्सचा शोध लावला. त्याच्या योगे केवळ बेरीज वजाबाकी करता येणारी व्यक्तीही मोठमोठाले गुणाकार भागाकार करू शकते. नेपियर साहेबांनी स्फेरिकल ट्रिगॉनॉमेट्री ही गणिताची शाखा विकसित केली. या पद्धतीचा वापर करून पृथ्वीच्या गोलाकार पृष्ठभागावरची अंतरे आणि कोन मोजता येतात. आज एकविसाव्या शतकातही स्फेरिकल ट्रिगॉनॉमेट्रीच्या ज्ञानाशिवाय नौवहन अशक्य आहे. राहता राहिली खोली. समुद्राची खोली मोजण्याची साधी सोपी पद्धत म्हणजे एका दोरीला एक खूप जड शिशाचं वजन बांधलेलं असे. एक अनुभवी खलाशी जहाजाबाहेर काढलेल्या एका फळीवर उभा राही. या फळीला लेडमॅन्स प्लॅटफॉर्म म्हणत. तो हे वजन दोरीच्या मदतीने गोल गोल फिरवून दूर फेकत असे आणि ते जाऊन तळाला टेकलं की किती दोरी पाण्यात भिजली यावरून पाण्याची खोली मोजत. हा खलाशी अनुभवी का असायला हवा याची कारणं जरा औरच आहेत. एकतर खोली अचूकपणे मोजता यावी, त्याबरोबर शिशाला लागलेल्या चिखलमातीवरून समुद्रतळ कसा आहे त्याचा अंदाज बांधावा लागे. पण त्याहूनही मह्त्त्वाचं म्हणजे ते जड शिसं फिरवताना चूक झाली तर ते डोक्यात लागून खात्रीचा मृत्यू किंवा ते वजन न पेलता आल्याने तोल जाऊन जलसमाधी मिळे. त्यामुळे या लेडमॅन्स प्लॅटफोर्मला बरेच जण डेडमॅन्स प्लॅट्फॉर्मही म्हणत.हे सगळं असताना कोलंबस वाट का चुकला? कोलंबसच्या काळात म्हणजे पंधराव्या शतकाच्या शेवटी सेक्स्टंट नव्हता, पण ऍस्ट्रोलोबवर त्याचं काम भागत असावं. प्रश्न दुर्बिणीचा नव्हता, अक्षांशाचाही नव्हता. प्रश्न होता रेखांशांचा. त्या काळात अचूकपणे रेखांश मोजण्याचं गणित नीटसं सुटलेलं नव्हतं, त्यामुळे आपण पूर्व-पश्चिम दिशेने किती अंतर आलोय ते नीटसं कोणालाच सांगता येत नव्हतं. अशा परिस्थितीत भारताचे रेखांश माहीत नसलेला कोलंबस पश्चिमेकडे निघाला आणि समोर जो पहिला भूभाग दिसला त्याला भारत समजून बसला. अशी झाली कोलंबसाची फसगत आणि बिचारा आपण भारत शोधल्याच्या आनंदातच स्वर्गवासी झाला. मग शेवटी मानवजातीला पाडलेलं हे रेखांशाचं कोडं कसं सुटलं? रेखांशांचे गणित नीट न जमल्यामुळे अनेक नाविकांचा बळी गेला होता. वाट चुकल्यामुळे महिनेच्या महिने सैरभैर भटकणारे काही दर्यावर्दी उपासमारीने मेले तर काही एका विचित्र रोगाला बळी पडले. अंगावर ठिकठिकाणी रक्तवाहिन्या फुटून रक्ताचे डाग पडलेले, सांधेदुखी, खिळखिळे दात आणि शेवटी मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन मृत्यू असा या रोगाचा प्रवास असायचा. समुद्रात फक्त मासे आणि सुकवलेले मांस खाऊन अनेक महिने काढल्यामुळे होणारा हा स्कर्व्ही रोग क जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो हे कळेपर्यंत अनेक खलाशांचा हालहाल होऊन अंत झाला. त्याकाळी महासागर पार करायला गेलेल्यांपैकी सुमारे एक तृतीयांशच लोक परत यायचे. अशा भयंकर संकटांची जाणीव असूनही दर्यावर्दी समुद्रसफरी करीतच राहिले. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल या देशांची साम्राज्यशाही अर्थव्यवस्थाच या समुद्र सफरींवर अवलंबून होती. याच काळात कोलंबस, वास्को ड गामा, मॅजेलन असे धाडसी दर्यावर्दी रेखांशांचा थांगपत्ता नसताना जीव धोक्यात घालून समुद्राच्या पाठीवर चाचपडत नवनवे मार्गे शोधात जगभर फिरत होते.१७०७ सालच्या ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट. अॅडमिरल सर क्लाउडिस्ली शोवेल आपल्या पाच जहाजांचा तांडा घेऊन जिब्राल्टरहून इंग्लंडला परतत होते. फ़्रेंच आरमाराबरोबर झालेल्या लढाईत जिंकल्याचा विजयोन्माद आसमंतात भरलेला होता, पण सतत बारा दिवस धुक्यात वाट हरवल्यामुळे अॅडमिरलसाहेब चिंतेत होते. त्यांनी आपल्या विश्वासू अधिकार्यांना एकत्र बोलवून रेखांशांचा हिशेब केला आणि आपण फ्रेंच किनार्यावरच्या उशांत बेटाजवळ असल्याचा अंदाज बांधला. या ठिकाणाहून सरळ उत्तरेला गेले की इंग्लंडचा किनारा समोर येईल असा त्यांचा अंदाज होता. जवळपास याच वेळी एक खलाशी घाबरत घाबरत अॅडमिरल शोवेलना म्हणाला, "माझ्या हिशेबाप्रमाणे आपण आणखी जास्त वायव्येला आहोत. येथून पुढे गेल्यास धोका आहे." त्याच्या या उद्धटपणाबद्दल त्याला वरिष्ठांविरुद्ध बंड केल्याच्या अरोपाखाली ताबडतोब फाशी देण्यात आलं. त्यानंतर काही तासांतच २२ ऑक्टोबर १७०७ च्या रात्री अॅडमिरल शोवेल यांच्या पाच जहाजांपैकी चार सिली बेटांच्या खडकांवर आपटून फुटली आणि २००० नाविक आपल्या प्राणांना मुकले. जे दोन वाचले त्यांमध्ये स्वतः शोवेल साहेब होते. ते इंग्लंडच्या किनार्यावर जिवंत पोहोचले, पण प्रचंड श्रम आणि जीवघेणी थंडी यांमुळे किनार्यावर निपचित पडले असताना एका स्त्रीने त्यांच्या हातातल्या पाचूच्या अंगठीसाठी त्यांचा खून केला. किनार्यावरून या दर्यावर्दींना योग्य ते मार्गदर्शन आणि राजाश्रयही मिळत होता. आकाशातल्या तार्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्राचे स्थान बघून त्या संदर्भाने कोणत्याही ठिकाणचे रेखांश काढण्याचा प्रयत्न होता तो. यात चंद्राच्या स्थानाचा उपयोग ग्रीनिचची प्रमाणवेळ ओळखण्यासाठी करून घेण्यात आला होता. ही पद्धत लूनर डिस्टन्स मेथड म्हणून ओळखली जात असे, पण त्या काळात तार्यांच्या स्थानांबद्दल खात्रीची माहिती उपलब्ध नसल्यामुळे ती पद्धत फारशी यशस्वी झाली नाही. १५९८ साली गॅलिलिओने आपली दुर्बीण वापरून केलेल्या आकाश निरीक्षणांमध्ये त्याला गुरूच्या चंद्रांच्या हालचालींचा सखोल अभ्यास करता आला. या चंद्रांच्या गुरुआड जाण्याच्या वेळांवरून रेखांश काढण्याचे गणित त्याने मांडले. ही पद्धत पुढची अनेक वर्षे जमिनीवर सर्वेक्षण करताना रेखांश काढण्यासाठी वापरली जात होती, पण दर्याच्या लाटांवर इतस्ततः फेकल्या जाणार्या जहाजावर उभे राहून ही निरीक्षणे करणं अशक्य होतं. गॅलिलिओचा ज्या वर्षी मृत्यू झाला त्याच वर्षी न्यूटनचा जन्म झाला. न्यूटनच्या गुरुत्त्वाकर्षणविषयक सिद्धांतांमुळे सूर्य, चंद्र, तार्यांच्या आकाशातल्या स्थानांबद्दल जास्त माहिती उपलब्ध झाली असली तरी रेखांशांचं कोडं मात्र सुटलं नव्हतं. न्यूटनने आपलं मत व्यक्त केलं होतं की ग्रीनिचच्या प्रमाण रेखांशावरची वेळ बिनचूकपणे दाखविणारं घड्याळ बनविता आलं, तर जगातल्या कोणत्याही स्थानाचे रेखांश सहजपणे ओळखता येईल. सूर्य पृथ्वीभोवती २४ तासात एक प्रदक्षिणा घालताना दिसतो म्हणजेच तो दर तासाला १५ अंश पश्चिमेला सरकताना दिसतो. त्यामुळे आपण ग्रीनिचपासून पश्चिमेकडे जायला सुरुवात केली तर दर १५ रेखांश अंतरावर सूर्य डोक्यावर येण्याची वेळ ग्रीनिचच्या एक तास नंतर असणार. म्हणजेच सूर्य कोणत्याही रेखांशावर येण्याची वेळ बारा वाजताची धरली आणि त्याच क्षणी ग्रीनिचची वेळ दाखवणार्या घड्याळातली वेळ पाहिली तर त्यांमधील फरकावरून त्या जागेच्या रेखांशाचा अचूक हिशेब करता येईल, परंतु अशा प्रकारचं घड्याळ बनवणं अशक्य आहे हेही न्यूटनने सांगितलं. लंबकाच्या घड्याळाचा शोध तेव्हा लागलेला होता पण त्या घड्याळांच्या अनेक समस्या होत्या. एक महत्त्वाचा प्रश्न होता वंगणाचा. त्या काळात घड्याळात वापरली जाणारी वंगणे अशी काही होती की त्यांच्यामुळेच घड्याळे अनेक वेळा बंद पडत असत. त्याहून महत्त्वाचा प्रश्न होता समुद्राच्या लाटांवर हेलकावणार्या जहाजावर लंबकाचं घड्याळ किती वेळ चालू राहू शकेल? थोडक्यात इतकंच की जोपर्यंत असं बिनचूक वेळ दाखवणारं घड्याळ बनत नाही तोपर्यंत रेखांशाचं गणितही सुटणं शक्य नाही हे सगळ्यांनाच समजून चुकलं होतं. दरम्यानच्या काळात रेखांश शोधक हा चेष्टेचा विषय झाला होता. रेखांशांचा शोध घेणारा म्हणजे कोणी तरी कामधंदा नसेलेला विक्षिप्त माणूस अशीच समजूत झालेली होती. ही एरवी सूज्ञ आणि सुशिक्षित समजल्या जाणार्या व्यक्तींनी अशा काही हास्यास्पद पद्धती सुचवल्या की त्यांच्या शहाणपणाबद्दल संशय निर्माण व्हावा. दोन गणितज्ञ डिटन आणि व्हिस्टन यांनी एक विचित्र पद्धत सुचवली. भर समुद्रात प्रत्येक अक्षांशावर एकेक जहाज नांगरून उभे करून ठेवायचे आणि दररोज बरोबर बारा वाजता त्या जहाजावरून एक तोफ डागायची. त्या आवाजावरून आसपासच्या जहाजांनी आपले रेखांश ओळखायचे. ही पद्धत अगदीच अव्यवहार्य होती, पण मूर्खपणाचा कळस केला तो सर केनेल डिग्बी या महाभागाने. त्याने एक सिंपथी पावडर अर्थात सहानुभूती चूर्ण शोधून काढले. एखाद्या जखमी व्यक्तीने वापरलेले बँडेज घेऊन त्यावर हे चूर्ण टाकले, की त्या व्यक्तीची जखम तर बरी होतेच पण जखमेची आगही होते, मग ती व्यक्ती कितीही दूर असो. या पद्धतीचा उपयोग रेखांश शोधण्यासाठी करताना एक युक्ती करायची. जहाजावर एक जखमी कुत्रा जहाजवर घेऊन जायचा, त्याचे बँडेज मात्र ग्रीनिचमध्ये ठेवायचे. ग्रीनिचला बारा वाजले, की त्या बँडेजवर ते चूर्ण टाकायचे, म्हणजे तो कुत्रा जिथे कुठे असेल तिथे भुंकणार आणि जहाजाच्या कप्तानाला ग्रीनिचला बारा वाजल्याचा संदेश मिळणार. रेखांश शोधण्याचे असे अनेक चित्रविचित्र मार्ग नियमितपणे सुचवले जात होते.१६७५ साली राजा दुसरा चार्ल्स याने रॉयल ऑब्जर्वेटरीची स्थापना केली ती मुख्यतः याच हेतूने. रेखांशांबद्दलच्या अज्ञानामुळे अपघात मात्र सतत घडतच होते. त्यामुळे त्रासलेल्या जहाज मालक, व्यापारी आणि दर्यावर्दींनी ब्रिटिश सरकारपुढे आपलं गार्हाणं मांडलं. शेवटी १७१४ साली ब्रिटिश सरकारने पार्लमेंटमध्ये एक कायदा पास केला त्यानुसार जो कोणी अर्ध्या अंशापर्यंत अचूकपणे रेखांश शोधण्याची पद्धत शोधून काढेल त्याला वीस हजार पौंडांचं बक्षीस देण्यात येईल. त्या काळात वीस हजार पौंडांची किंमत आजच्या सुमारे पाच लाख पौंडांएवढी होती. या पद्धतीची पडताळणी इंग्लंडहून वेस्ट इंडिजला जाणार्या एका जहाजावर घेण्यात येईल, या काळात रेखांशाचं गणित अर्ध्या अंशापेक्षा बाहेर जाता कामा नये अशी अट होती. यॉर्कशायरमधल्या एका सुतारच्या मुलानं हे आव्हान उचललं. त्याचं नाव जॉन हॅरिसन. लोकार्थानं त्याचं शिक्षण अजिबात झालं नसलं तरी तो स्वतःच्या प्रयत्नांनी लिहायला वाचायला शिकला होता. त्याला घड्याळे बनवण्याचा छंद होता. त्याने १७२८ ते १७३५ या काळात एक घड्याळ बनवले, त्यात लंबकाचा वापर केला गेला नव्हता. त्यामुळे जहाजाच्या हेलकाव्यांची आणि तापमानातल्या बदलांची चिंता उरली नाही. हॅरिसन आपले हे घड्याळ घेऊन लंडनहून लिस्बनपर्यंत प्रवास करून आला. प्रवासात या घड्याळाने अचूक वेळ दाखवली, पण अद्याप त्याने ऍटलांटिक महासागर पार केला नव्हता. या घड्याळाचा उल्लेख एच वन म्हणून केला जातो. त्यानंतर सरकारी तिजोरीतून विळोवेळी मिळत गेलेल्या मदतीच्या आधारे पुढची सुमारे ४० वर्षे जॉन हॅरिसन व त्याचा भाऊ जेम्स यांनी या घड्याळाच्या चार आवृत्त्या काढल्या. त्यापैकी एच ४ तर सगळ्या कसोट्यांवर उतरून ठरलेल्या सर्व अटी पूर्ण करून त्याहीपेक्षा जास्त बिनचूक वेळ दाखवत होते. दरबारात हॅरिसन बंधूंचा मान दिवसेंदिवस वाढत असला तरी या विषयी नेमेलेल्या तज्ञ समितीने त्यांना अतोनात त्रास दिला. ठरलेल्या अटी वाढवत नेऊन त्यांच्याकडून एका ऐवजी सहा घड्याळे बनून घेतली एवढेच नाही तर हे घड्याळ बनविण्याची कृती जाहीर करायला लावून ती दुसर्या एखाद्या घड्याळजीला शिकविण्याची अट घातली आणि ती पूर्ण झाल्यावरच शेवटी बक्षीसाची रक्कम त्यांना दिली. त्यांनी बनविलेलं "क्रोनोमीटर" पुढची सुमारे अडीचशे वर्षे, म्हणजे अगदी आता आता पर्यंत जगातल्या प्रत्येक जहाजावर दिशादर्शनासाठी अत्यावश्यक उपकरण म्हणून वापरलं जात होतं. आजमितीस त्याची तेवढी गरज लागत नसली तरी जागतिक कीर्तीच्या अनेक शास्त्रज्ञांना चक्रावून टाकणार्या या रेखांशाचं कोडं उलगडणार्या जॉन हॅरिसनला आणि त्याने कप्तानाच्या हाती दिलेल्या त्या चमत्कारिक घड्याळाला इतिहास कधीच विसरू शकणार नाही.राहता राहिला प्रश्न, "कोलंबस वाट का चुकला?" कोलंबस ज्या काळात महासागर पार करायला निघाला होता तेव्हा जगाचा विस्तार नक्की किती आहे, युरोपाकडून पश्चिमेला गेलं तर काय समोर येईल, रेखांश कसं शोधायचं; कशाकशाचा पत्ता नसताना केवळ आपल्या हिंमतीवर विश्वास ठेवून आपली जहाजं आणि आपले जीव समुद्रात झोकून देणारे हे दर्यावर्दी पाहिले की एकच विचार मनात येतो, "त्या काळात जहाजं लाकडाची बनवलेली असतील, पण माणसं मात्र पोलादी असायची!"
कोलंबस वाट का चुकला ?
By admin | Published: February 28, 2017 5:49 AM