बेपत्ता अश्विनी बिद्रेची हत्या करून खाडीत मृतदेह फेकल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 02:58 AM2017-12-18T02:58:35+5:302017-12-18T02:58:50+5:30
बेपत्ता पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याचा साथीदार राजेश पाटीलने हत्या करून त्यांचा मृतदेह भार्इंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय दोघांच्याही टॉवर लोकेशनवरून वर्तवण्यात येत आहे. यासाठी कुरुंदकर यांची गाडी वापरल्याची माहितीही समोर येत आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत़
मुंबई : बेपत्ता पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याचा साथीदार राजेश पाटीलने हत्या करून त्यांचा मृतदेह भार्इंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय दोघांच्याही टॉवर लोकेशनवरून वर्तवण्यात येत आहे. यासाठी कुरुंदकर यांची गाडी वापरल्याची माहितीही समोर येत आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत़
नवी मुंबई मानवाधिकार विभागात कार्यरत असलेल्या बिद्रे यांचे ठाणे ग्रामीणचे कुरुंदकर यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. कुरुंदकर यांना पत्नी व दोन मुले आहेत. बिद्रे यांनी कुरुंदकर यांच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. यामुळे कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोज भांडणे होत होती. कुरुंदकर यांनीच बिद्रे यांचा काटा काढल्याचा संशय आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी बिद्रे कळंबोली येथील घरातून निघाल्या. तेथून त्या सायंकाळी ६ च्या सुमारास कळंबोली रेल्वे स्थानकावरून कुरुंदकरला भार्इंदर भेटायला गेल्या. रात्री ११ च्या सुमारास त्यांचा मोबाइल बंद होता. रात्री २.४० वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्यांचा साथीदार राजेश पाटील (माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा) यांचे मोबाइल टॉवर लोकेशन भार्इंदर पुलावरील येत आहे.
अश्विनीची हत्या करून कुरुंदकरने त्यांना याच खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. यासाठी कुरुंदकरने त्यांच्या लाल रंगाच्या फोक्स वॅगन (वाहन क्रमांक एमएच १० ए एन ५५००) या गाडीचा वापर केला असल्याचे समोर येत आहे. ही गाडी सांगलीच्या धामणी रोड येथील जीनेश्वर कॉलनीतील रहिवासी रमेश चारुदत्त जोशी यांच्या नावावर आहे. त्याने ही गाडी कुरुंदकरला भेट दिल्याचे समोर येत आहे. जुलै २०१६ मध्ये कळंबोली पोलिसांनी बिद्रे यांच्या इमारतीखालील दोन सुरक्षारक्षकांचे जबाब नोंदविले होते.
कुरुंदकर यांच्या घरातून रक्ताचे डाग असलेला टॉवेल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा टॉवेल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. यावरून हे रक्त बिद्रे यांचे आहे का, हे तपासण्यासाठी बिद्रे यांचे पती राजू गोरे व आठ वर्षांच्या मुलीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. दोन्ही रक्ताचे नमुने डीएनएसाठी पाठविण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.
मच्छीमारांचे जबाब नोंदविले
बिद्रे यांची हत्या केल्याच्या काही दिवसांनंतर कुरुंदकर भार्इंदरच्या खाडीला भेट देत होते. तेथील स्थानिकांशी संपर्क साधून एक मृतदेह आढळला का याची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी काही मच्छीमारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हत्या झाल्यानंतर बिद्रे यांच्या वडिलांना कुरुंदकरने काही दिवस उत्तराखंडमध्ये मेडिटेशनला जात असल्याचा संदेश मोबाइलवरून पाठवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.