कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ६४ गावात दुष्काळ होता. मी जलसंपदामंत्री झाल्यानंतर ११ ऑगस्ट २०१९ वारणा प्रकल्पाच्या फेरनियोजनाला मंजुरी दिली. कमी कालावधील हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. महाविकास आघाडीने यात जास्त प्रयत्न केले आहेत. आता ६५ गावांना पाणी मिळणार आहे, त्याला राज्य सरकारने मान्यता लवकरात लवकर देऊन लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली.
सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकातील लोकांनी करू नये, असंही जयंत पाटील म्हणाले.
'जत तालुक्यातील ६५ गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे पाणी तिथे जात नव्हते. या गावांना पाणी मिळावे यासाठी येथील नागरिक अनेक वर्षांपासून मागणी करत होते. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर जलसंपदा मंत्री या नात्याने ११ ऑगस्ट २०२१ ला वारणा नदीच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करण्यास मान्यता दिली. या फेरनियोजनामुळे अतिरिक्त ६ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितले.
'म्हैसाळ प्रकल्प माध्यमातून या ६५ गावांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले. मी स्वतः या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आणि फार कमी काळात हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आणला. कोरोनामुळे या प्रकल्पाचे काम झाले नाही असे म्हणणे फार चुकीचे आहे. महाविकास आघाडीने यात कोणतीही दिरंगाई केली नाही. प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असून मंत्रिमंडळाने प्रकल्प पुढे घ्यावा आणि त्याला मान्यता द्यावी, प्रकल्प सुरू करून टाकावा, अशी जयंत पाटील यांनी केली.
कर्नाटकचा जतच्या ४० गावांवर दावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात खडसावलं
'आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून आम्हाला कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी' अशी भूमिका २०१६ साली या ग्रामस्थांनी मांडली होती. आज या गावकऱ्यांची तशी कोणतीही भावना नाही. मला विश्वास आहे की, आमच्या जतचे ग्रामस्थ कर्नाटकाच्या कारस्थानाला बळी पडणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.