मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे नेहमीच मराठी चित्रपट आणि कलाकारांच्या पाठीमागे ठामपणे उभे असतात. 'बुक माय शो' वरून अनेकदा आपण चित्रपटाचे तिकीट बूक करतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठी नाट्यनिर्मात्यांना बुक माय शोकडून होणाऱ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. यानंतर निर्मात्यांनी याबाबतची माहिती खोपकर यांना दिली असून यावर तोडगा काढण्याची विनंतीही केली. यावर आता मनसेने बुक माय शो विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अमेय खोपकर (MNS Ameya Khopkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं असून बुक माय शोला इशारा दिला आहे. 'मनसे पद्धतीने' या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. "बुक माय शो प्रणालीकडून मराठी नाट्यनिर्मात्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय अशा तक्रारी आलेल्या आहेत. पैसे वेळेवर न मिळणं, नाटकांच्या वेळा तसेच नाट्यगृहांची माहिती योग्यवेळी अपडेट न करणं हे प्रकार बुक माय शोकडून वारंवार होत आहेत" असं म्हटलं आहे.
"यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मनसेतर्फे बुक माय शोकडे सध्या निवेदन देण्यात येत आहे. या प्रकरणाचा मनसे पद्धतीने पाठपुरावा करू हे ठोस आश्वासन मी नाट्यनिर्मात्यांना देत आहे" असं अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' (Bhonga) या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली. कारण, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनसेच्या नेत्यांनी या चित्रपटाचे प्रस्तुतीकरण केले आहे. त्यानंतर मोठ्या पडद्यावर भोंगा चित्रपट प्रदर्शित झाला. मनसेच्या संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. मात्र, आता हा चित्रपट सिनेमागृहात काढायला लावण्यात येत असल्याचं मनचिसेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं.
अमेय खोपकर यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. '‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय. जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?', असा सवाल अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन विचारला होता.