व्यंगचित्रासाठी राहुल गांधींचा नाही; उद्धव ठाकरेंसह 'या' नेत्यांचे चेहरे आहेत परफेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 09:13 PM2020-03-01T21:13:42+5:302020-03-01T21:22:32+5:30
राज्यात निवडणुकीनंतर जे घडलं ते दुर्दैवी आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष विरोधीपक्षात बसला असल्याने याचा परिणाम नंतर वाईट होतो.
सध्याचं राजकारण खूप विचित्र आहे, असं म्हणावं लागेल. कारण सध्या एकमेकांसोबत निवडणुका लढवायच्या दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची आणि सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचं. हे दुर्देवी आहे असल्याचे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, राज्यात निवडणुकीनंतर जे घडलं ते दुर्दैवी आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष विरोधीपक्षात बसला असल्याने याचा परिणाम नंतर वाईट होतो. तसेच महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चांगलं नसल्याचे सांगत पुढच्या पिढीला आपण काय संदेश देणार आहोत असं राज ठाकरेंनी सांगितले. ठाण्यात महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या कलासंगम कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
राजकारणातील कोणत्या नेत्यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी परफेक्ट आहे असा प्रश्न विचारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा चेहरा देखील व्यंगचित्र काढण्यासाठी योग्य असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा चेहरा चांगला नसल्याचे सांगत राहुल गांधींचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधींचा चेहरा चांगला होता असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.