मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन गेल्या महिनाभरापासून राज्यात शाब्दीक गदारोळ माजला आहे. काहींनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेला समर्थन दिलं, तर काहींनी त्यांच्या या भूमिकेला विरोधही केला होता. शिवसेनेच्या महिला नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरे आजपर्यंत कुठेही विजयी झालेले नाहीत, आता तरी विजयी व्हावेत. आता, तरी त्यांची सभा यशस्वी होऊन त्यानिमित्ताने विजय मिळो, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (MNS Amit Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, मनसेनंही त्यांना प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे चा अल्टीमेटम दिला होता. यानंतर पोलिसांनीही कारवाई करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. तसंच काहींना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको,” असं म्हणत दीपाली सय्यद यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. आता मनसेनंही याला प्रत्युत्तर दिलं आहे.