“पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर नरमले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:36 PM2024-04-22T21:36:07+5:302024-04-22T21:36:55+5:30
MNS Vaibhav Khedekar News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो संघर्ष केला, त्याची फळे यायची वेळ आली आहे. महायुतीच्या प्रचारात मनसैनिक सक्रीय सहभागी होत आहेत, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे.
MNS Vaibhav Khedekar News: राज ठाकरे यांचे आदेश आहेत. पक्षासाठी कोरड्या विहिरीत उडी मारण्याची तयारी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात जो संघर्ष केला, त्याची फळे यायची वेळ आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मी चालणार आहे, असे मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर वैभव खेडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. मात्र, राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर यांनी महायुतीच्या प्रचारात सक्रीय सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, या राजकारणात कुणी कुणाचा दोस्त नसतो आणि कुणी कुणााचा दुश्मन नसतो. त्यामुळे भविष्यात या सगळ्या गोष्टी जुळून येतील, असा मला विश्वास आहे. आता आमची महायुती झालेली आहे. रामदास कदम महायुतीचे नेते आहेत. महायुतीचे वातावरण चांगले आहे. त्यामुळे यामध्ये मिठाचा खडा होऊ इच्छित नाही. ते काही बोलले असतील, त्याची दखल राज ठाकरे यांनी घेतलेली आहे, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे.
महायुतीचा प्रचार जोरदारपणे सुरू झालेला आहे
महायुतीचा प्रचार जोरदारपणे सुरू झालेला आहे. प्रत्येक तालुक्यात महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी यांच्या एकत्रित बैठका होत आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठीचे नियोजन सुरू आहे. येत्या १५ दिवसांत अधिकचे मतदान रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या बाजूने कसे पडेल, यासाठी मनसैनिक कसोशिने प्रयत्न करणार आहे, असेही वैभव खेडेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्राच्या उभारणीसाठी आणि देशासाठी एक आश्वासक नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४०० पारचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. विरोधकांच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेला जनता कंटाळली आहे आणि महायुतीला पाठिंबा देत आहे, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे.