मनसेनं उद्धव ठाकरेंना दाखवली 'दिशा'; बलात्कार प्रकरणांच्या निकालासाठी आग्रही सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 03:25 PM2019-12-18T15:25:34+5:302019-12-18T16:34:44+5:30
राज्यातील जनता अशाप्रकारच्या कायद्याची वाट पाहतेय त्यामुळे महाराष्ट्रात दिशा कायदा समंत करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिला सुरक्षेच्या मुद्दा चर्चिला जात आहे. राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वारंवार घडत आहेत. त्यामुळे बलात्कार पीडितेला न्याय देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा विधानसभेत पारित केला असा कायदा महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात राजू पाटील यांनी म्हटलंय की, आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू करुन देशात पहिलं राज्य बनण्याचा मान मिळविला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. या कायद्यात कलम 354 मध्ये सुधारणा करुन बलात्कार आणि सामुहिक बलात्कार अशा प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या सात दिवसात तपास व पुढील चौदा दिवसात न्यायालयात जलद गतीने सुनावणी घेवून एकवीस दिवसाच्या आत दोषींना फाशीसारखी शिक्षा देण्याची तरतूद असल्याचं सांगितले आहे.
तसेच महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात वर्षानुवर्षे तपास आणि सुनावणी सुरु असते. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक व वचक राहिलेला नाही, बलात्कार पीडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधी लागतो. महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशसारखा कठोर कायदा करण्याची वेळ आता आलेली आहे. राज्यातील जनता अशाप्रकारच्या कायद्याची वाट पाहतेय त्यामुळे महाराष्ट्रात दिशा कायदा समंत करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
तर याबाबत विधान परिषदेत माहिती देताना गृहमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, राज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर जबर वचक बसावा, यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशासारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याशी चर्चा झाली आहे. दिशा कायद्याबाबत माहिती घेतली असून तशा प्रकारचा कायदा करण्यासाठी अस्तित्वातील कायद्यांमध्ये काय बदल करणे गरजेचे आहे, यासंदर्भात विधि व न्याय विभागाचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितले.