मनसेचा 'शॉक'; राज ठाकरेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ठाण्यात पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट
By मोरेश्वर येरम | Published: November 26, 2020 01:29 PM2020-11-26T13:29:20+5:302020-11-26T13:48:30+5:30
मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना मनसे नेत्याकडून निवेदन
मुंबई
वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसेचे राज्यभरात ठिकठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत वांद्रे येथे जिल्हाधिकाऱ्या कार्यावर मनसेच्या नेत्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावतीने मनसेच्या नेत्यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
ठाण्यात मनसेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. ठाणे पोलिसांकडून मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा काढला. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मोर्चाचं नेतृत्व करत होते. पोलिसांनी मनसेचा मोर्चा सुरू होताच अडवणूक केली त्यानंतर आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्कीचा प्रकार घडला. पोलिसांनी अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
नाशिक, नागपूर, पुण्यातही आंदोलन
मुंबई, ठाण्यासह पुणे, नाशिक, नागपूरमध्येही मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. पुण्यात मनसेच्या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली होती. तर मनसेचा गड मानला जाणाऱ्या नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. नागपुरात देखील मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव वीजबिला संदर्भातील निवेदन दिले.
वीज बिल न भरण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन
मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांच्यावतीने निवेदन देण्यात आल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ''वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांचं पत्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी मोर्चाकाढून निवदेन दिलंय. पण वीज बिलासाठी कुणी मीटर कापण्यासाठी जनतेच्या घरी आलं तर त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रीक शॉक दिल्याशिवाय महाराष्ट्रसैनिक गप्प बसणार नाही आणि याची जबाबदारी प्रशासनाची असेल'', असं संदीप देशपांडे म्हणाले.