मुंबई - सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं. "माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख?" असा सवाल त्यांनी केला. यानंतर आता मनसेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"तुमच्या मनात हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?" असा खोचक सवाल मनसेने उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेसने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाले नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्हपणा का आहे? हा पझेसिव्ह नेस आहे की असुरक्षितता?" असं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मनसेने याआधी देखील अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे Simpathy" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच ||‘साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले|| असं कॅप्शन देत एक व्यंगचित्र देखील शेअर केलं आहे. यात मुलाखतीसाठीचा स्टुडिओ दिसतोय. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे. "हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तरं" असं संजय राऊत म्हणतात. त्यावर "बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं" असं उद्धव ठाकरे म्हणतात.
संभाषणावेळी संजय राऊतांच्या हातात घड्याळ आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शरद पवार बोलतील तसंच वागत असल्याची टीका होत असताना त्यावर या व्यंगचित्रातून भाष्य करण्यात आलं आहे. मनसेने अनेकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, ‘ही आमची शिवसेना’ म्हणून. अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार आहे. हे बघितल्यानंतर भाजप त्यांना कधी पुढे करेल असे वाटत नाही. नाही तर नंतर ते नरेंद्र मोदींशी स्वतःची तुलना करतील आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते, ही चटक आहे, असं म्हणत निशाणा साधला.