मनसेचा पुण्यातील 'स्मार्ट सिटी' प्रस्तावाला पाठिंबा
By Admin | Published: December 14, 2015 05:04 PM2015-12-14T17:04:44+5:302015-12-14T17:33:48+5:30
स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचे सांगत या योजनेला कडाडून विरोध दर्शवणा-या मनसेने घूमजाव करत पुण्यातील प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १४ - स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचे सांगत या योजनेला कडाडून विरोध दर्शवणा-या मनसेने घूमजाव करत पुणे स्मार्ट सिटीच्या केंद्राकडे पाठवण्याच्या प्रस्तावास पाठिंबा दर्शवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मनसेने या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन 'स्मार्ट सिटी'च्या प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी केली. त्यावर सर्व पक्षांशी चर्चा करून आपण योग्य कार्यवाही करू अशे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांना दिले. त्यानंतर 'मनसे'नी 'स्मार्ट सिटी'ला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
पुण्याचा समावेश "स्मार्ट सिटी"च्या पहिल्या यादीत व्हावा, यासाठी महापालिकेने केलेला आराखडा पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला होता. मात्र राज्य सरकारने आदेश काढून याबाबतचा निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या आज (सोमवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्याची मांडणी होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आराखडा मंजूर करण्याचा आदेश महापालिकेतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र, त्यांचे काही आक्षेप होते. शिवसेनेनेही काही बदल सुचविले होते.
यापूर्वी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्मार्ट सिटी योजनेवर टीका केली होती. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेली ‘स्मार्ट सिटी’ योजना फसवी असून, केवळ राजकीय फायद्यासाठी ही योजना आणण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.