नेत्यांनी पैसा गडप केल्याने तरुण मागे
By admin | Published: August 2, 2016 02:10 AM2016-08-02T02:10:03+5:302016-08-02T02:10:03+5:30
मातंग समाजातील तरुणांसाठी असलेला महामंडळातील पैसा काही नेत्यांनी गडप केल्याने या समाजातील तरुण अद्यापही मागे आहेत.
मुंबई: मातंग समाजातील तरुणांसाठी असलेला महामंडळातील पैसा काही नेत्यांनी गडप केल्याने या समाजातील तरुण अद्यापही मागे आहेत. मात्र लवकरच या समाजासाठी चांगली घोषणा करण्यात येणार असून या समाजातील तरुणांनी देखील आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायला हवे, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चेंबूरमधील कार्यक्रमात व्यक्त
केली.
अण्णाभाऊ साठे यांची ९६वी जयंती आज चेंबूरच्या साठे उद्यानात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यापूर्वीच्या सरकारमध्ये असलेल्या काही नेत्यांनी मातंग समाजातील गरीब तरुणांसाठी असलेल्या करोडो रुपयांवर डल्ला टाकला.
या नेत्यांनी आपण अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने हा पैसा खातोय, याची तरी जाण ठेवायला हवी होती. मात्र त्यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला. आम्ही देखील त्यांना सोडलेले नाही. त्यांना अधिकाधिक कडक शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
महिनाभरापूर्वी एक बैठक घेऊन मातंग समाजासाठीचा एक कृती अहवाल तयार करण्यात आला आहे. तथापि, अधिवेशन सुरु असल्याने त्याची घोषणा मी करणार नाही. मात्र यात समाजातील तरुणांसाठी शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि घरांसारख्या प्रश्नांवर विचार करण्यात आला आहे. समाजातील तरुण आजही
पारंपरिक व्यवसायावर अवलंबून आहेत. या तरुणांसाठी जेवढा पैसा लागेल, तेवढा खर्च करु, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आणि मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज अण्णाभाऊ साठे यांची ९६वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी आण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी साठे उद्यानात हजेरी लावली. तसेच रात्री उशीरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल येथे सुरु होती. (प्रतिनिधी)