लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस राजधानी मुंबईसह पुन्हा एकदा राज्यभरात सक्रिय होत असून, हवामानात होत असलेल्या बदलांमुळे पुढील चार दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार ६ आणि ७ ऑगस्टला कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारादेखील वाहील.
पाऊस का पडणार ?मान्सूनचा आस देशातील त्याच्या सरासरी जागेपासून उत्तरेकडे म्हणजे हिमालयाच्या पायथ्याकडे शिफ्ट झाल्यामुळे उघडीप जाणवली होती. मात्र, आज, शुक्रवारपासून पुन्हा त्याच्या मूळ सरासरी जागेवर किंवा त्यापेक्षाही अधिक दक्षिणेकडे सरकण्याच्या व त्यामुळे पावसासाठी अनुकूलतेच्या शक्यतेमुळे पाऊस पडेल.समुद्रसपाटीपासून उंच आकाशात तीन किमी ते सात किमी अंतरादरम्यान मंगळूर, बंगळुरू व चेन्नई या शहरांवरून जाणारा पूर्व-पश्चिम एकमेकांविरुद्ध समांतर जाणारा वाऱ्याचा शिअर झोन अधिक अक्षवृत्तीय अंतरावरील उत्तरेकडे म्हणजे गोवा व दक्षिण महाराष्ट्रातील शहरावरून येत्या ३-४ दिवसांत शिफ्ट होण्याच्या वा जाण्याच्या शक्यतेमुळे पाऊस पडेल.
चेन्नई, नेल्लोर, मच्छलिपटणम शहरांदरम्यान बंगाल उपसागरात पूर्व किनारपट्टीसमोर जमिनीपासून एक किमी अंतरावर असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे मान्सून १२ दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात सक्रिय राहण्याची शक्यता जाणवते.
शुक्रवारपासून अपेक्षित असलेल्या मान्सूनची सक्रियता कदाचित एक दिवस अगोदरच म्हणजे गुरुवारपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार पावसाने सुरुवात होऊ शकते. विशेषत: सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची सुरुवात होईल.- माणिकराव खुळे, माजी अधिकारी, हवामान खाते.
कधी, केव्हा पडणार पाऊस?४ ऑगस्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.५ ऑगस्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया६ ऑगस्ट : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा७ ऑगस्ट : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.