मुंबई-
येत्या दोन दिवसांत केरळसह दक्षिण भारतातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत पूर्वमोसमी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसारगात विषववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपवणारे बळकट दमदार पावसाळी वारे तसेच ताशी ४५ किमी झटक्याखाली पुढील पाच दिवस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आज अंदमान निकोबार बेटे व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
या सर्व अनुकूलता जरी असल्या तरी प्रत्यक्षात मान्सून पाऊस तळ कोकण व घाट ओलांडून मध्य महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला येतो. सध्या मे च्या शेवटच्या आठवड्यात पूर्व मोसमी अवकाळी पाऊस राज्यात दाखल होऊ शकतो.