- राहुल वाडेकर
विक्र मगड : साखरे येथील जादूटोणा व पैशाचा पाऊस पाडण्याच्या प्रकारामुळे दोन वर्षांपूर्वी विक्रमगड चर्चेमध्ये आले होते. सोमवार, १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्याची पुनरावृत्ती झाली. तालुक्यातील कुर्झे-दगडीपाडा येथे दहशतवाद व नक्षलविरोधी पथक व स्थानिक पोलिसांनी छापा टाकून पुन्हा पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या छाप्यामध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन सारे पसार झाले. मात्र एकाला पोलिसांनी पकडले आहे.
कुर्झे-दगडीपाडा येथे पैशाचा पाऊस पाडला जाणार असल्याची माहिती दहशतवाद व नक्षलविरोधी पथकाचे साहाय्यक प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली होती. त्यांनी विक्र मगड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून सोमवारी मध्यरात्री जेथे हा भोंदूगिरीचा प्रकार सुरू होता तेथे कारवाई केली. ही टोळी कुर्झें परिसरातील दगडीपाडा भागातील भिल डोंगरी येथील दत्त मंदिर येथे जमली होती. मध्यरात्रीच्या अंधारात पोलीस कारवाईला गेले तेव्हा तेथील अनेक जण अंधाराचा फायदा घेत पळाले.
मात्र, त्यातील नालासोपारा येथे राहणाºया वालक्या नामा भगर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या ठिकाणावरून पोलिसांनी पूजेचे साहित्य, बनावट नोटा असे साहित्य जप्त केले आहे. आरोपीवर विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोतदार करीत आहेत.
जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागामध्ये शहरी भागातील सुशिक्षितांना जादूटोण्याच्या नावे फसवणाºया टोळ्या वाढल्या आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. अनेक जण पळाल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.- मानसिंग पाटील,साहाय्यक प्रभारी अधिकारी(नक्षल व दहशत विरोधी पथक)