मुंबई : मान्सून राज्यभर सक्रिय झाला असून, मध्य महाराष्ट्रातही गेल्या २४ तासांत पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. विशेषत: गेल्या ४८ तासांत राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या नोंदी होत असून, २५ जुलैपर्यंत ही स्थिती कायम राहील. महत्त्वाचे म्हणजे, हा पुढील आठवडा राज्यभरात मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर निश्चितच बळीराजाला दिलासा मिळेल.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
स्कायमेटकडील माहितीनुसार, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील बºयाच भागांत गडगडाटासह चांगला पाऊस झाला आहे. अकोला, औरंगाबाद, नाशिकमध्ये गडगडाटी पाऊस पडला. विदर्भात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी होणार असला, तरी पुढील काही दिवस एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस सुरू राहील. त्यामुळे पावसाची तूट थोड्या प्रमाणात कमी होईल.
मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस अनुभवास मिळेल. मध्य-महाराष्ट्रासह कोकण आणि गोवा येथे सारखीच परिस्थिती राहील. मुंबईत पावसाचा जोर कमी असेल. शहर आणि उपनगरात मध्यम सरींची शक्यता आहे. ४८ तासांनंतर कोकण आणि गोव्यासह मुंबईत पावसाचा जोर वाढेल. येत्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची तूट कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल.
२६ जुलैपासून तीव्रता वाढणारअरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत सक्रिय असलेल्या हवामान प्रणालीचा मराठवाडा आणि विदर्भावर परिणाम होत आहे. परिणामी, राज्यभरात ठिकठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. येत्या २४ ते ४८ तासांत पुणे, सातारा, कोल्हापूर आणि परभणी, हिंगोली, औरंगाबाद व जालना या जिल्ह्यांत एक ते दोन जोरदार सरींसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. २३ जुलै आणि २४ जुलै रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल. याच वेळी कोकण आणि गोव्यामध्ये मान्सून अधिक सक्रिय होईल आणि उत्तरेकडे सरकेल. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सांगली येथे गडगडाटासह चांगल्या पावसाची शक्यता आहे. २६ आणि २७ जुलै रोजी पावसाच्या तीव्रतेत वाढ होईल.
राज्यासाठी अंदाज२२ ते २३ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.२४ ते २५ जुलै : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.मुंबईसाठी अंदाज२२ ते २३ जुलै : शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.