विविध वस्त्रोद्योग घटकातील ३३ कंपन्यांसमवेत सामंजस्य करार; ५ हजार ५०० कोटींची गुंतवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 07:25 PM2023-11-01T19:25:54+5:302023-11-01T20:00:02+5:30
तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी टेक्सफ्यूचर परिषद एक प्रगतिशील पाऊल
मुंबई: वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण २०२३-२०२८ घोषित केलेले आहे. केंद्रे सरकारच्या ५ F (फार्म, फायबर, फॅब्रिक,फॅशन आणि फॉरेन एक्स्पोर्ट) या भविष्यकालीन धोरणाशी सुसंगत असे धोरण तयार करण्यात आले आहे. यामाध्यमातून संपूर्ण वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार शृंखला निर्माण करणे, ती एकत्रीत करणे आणि वस्त्रोद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा या धोरणाचा उद्देश असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आर्थिक विकासाला चालना, रोजगार निर्मिती, कापड उत्पादनात महाराष्ट्राला अग्रेसर राहण्यासाठी टेक्सफ्यूचर गुंतवणूक परिषद एक प्रगतिशील पाऊल आहे. या परिषदेत विविध वस्त्रोद्योग घटकातील ३३ कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून ५ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राज्यातील तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरणात 45 टक्के तांत्रिक वस्त्रोद्योग घटकांना भांडवली अनुदान (सबसीडी) देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोविड काळातील काही वस्त्रोद्योग घटकांचे भांडवली अनुदान प्रलंबित राहिले आहे. त्याबाबत आर्थिक तरतूद करून भांडवली अनुदान लवकरच देण्यात येईल असे आश्वासन मंत्री पाटील यांनी गुंतवणूकदांना या परिषदेत दिले.
वस्त्रोद्योग विभाग आणि सीआयआय (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्सफ्यूचर २०२३ गुंतवणूकदारांची एकदिवसीय परिषद हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. शाश्वत उत्पादनासाठी पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भांडवली सबसिडी देऊन विविध युनिट्सला प्रोत्साहन दिले आहे. तसेच सहा तांत्रिक वस्त्रोद्योग पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे. असे सांगून वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या व्यावसायिक बांधवांचा या परिषदेतील सहभाग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची नांदी आहे असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.