मुंबई : राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. चित्रपट व नाट्यसृष्टीतील संस्था व नामवंतांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी रसिकांना सुखावणारा निर्णय घेतला.
ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून तर धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारीच घेतला होता. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर १५ दिवसांनी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडली जातील. ५ नोव्हेंबर या मराठी रंगभूमी दिनापासून तरी नाटकांचा पडदा उघडावा, अशी अपेक्षा नाट्यसृष्टीने व्यक्त केली होती. त्याआधीच दोन्ही क्षेत्रे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मात्र, दोन्ही ठिकाणी कोरोना नियम पाळावे लागतील. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, खा. संजय राऊत, निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.
आसनक्षमतेची अट कायम?चित्रपट व नाट्यगृहांना आसनक्षमतेची अट कायम राहण्याची शक्यता आहे. आधी मार्गदर्शक सूचना येतील आणि त्यानुसार व्यवस्था करण्यास काही दिवस लागतील, अशी स्थिती आहे. मार्च २०२० मध्ये चित्रपट व नाट्यगृहे बंद करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटींवर ती पुन्हा सुरू करण्यात आली. ४ नोव्हेंबर रोजी हा निर्णय शासनाने घेतला; पण प्रत्यक्षात दोन्ही सुरू होण्यास किमान एक महिना लागला होता.
चित्रपट व नाट्य क्षेत्राची बहुप्रतीक्षित मागणी राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे ही क्षेत्रे आर्थिक अडचणीतून बाहेर येतील. मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, खुले रंगमंच याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आठवडाभरात जारी करण्यात येतील.अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद असल्याने इंडस्ट्रीमधील सगळ्यांची गणितं बिघडली होती. कलावंतांसह संबंधित सर्वांची अवस्था वाईट होती. त्यामुळे या निर्णयाचा अतिशय आनंद झाला.अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते.