भीक नाही, हक्क मागतोय! नाहीतर, आम्ही तलवारी काढू; संभाजीराजेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 03:23 AM2020-10-10T03:23:45+5:302020-10-10T06:52:24+5:30
‘मराठा क्रांती’च्या तिसऱ्या पर्वाला प्रारंभ
तुळजापूर : (जि़ उस्मानाबाद) : सरकार मग ते राज्यातील असो की केंद्रातील़ त्यांनी मराठा समाजाच्या भावना समजून घ्याव्यात़ आम्ही भीक नाही, हक्क मागतोय. कायदा हातात घ्यायचा नाही़ पण, तशी वेळ आणू नका़ आमच्याकडे साध्यासुध्या तलवारी नाहीत, असा इशारा खा़ संभाजीराजे यांनी शुक्रवारी
येथे दिला.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शुक्रवारी तुळजापूर येथे खा. संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले़ तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनाच्या तिसºया पर्वाला सुरुवात करण्यात आली. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांचे होते़ पुढे छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण देऊन उन्नतीचा मार्ग दाखविला़ तेच स्वराज्य अन् तेच आरक्षण आता पुन्हा एकदा प्रस्थापित करायचे आहे. यासाठी हा लढा आहे़ सर्वोच्च न्यायालयाने आमच्या भावना समजून घ्याव्यात़ राज्य, केंद्र सरकारनेही त्या लक्षात घ्याव्यात.
मराठा-ओबीसींत भांडणे लावण्याचा डाव...
आपलेच काही लोक, पुढारी टीव्हीवर जे मिळेल ते पदरात पाडून घेऊ, असे बोलत आहेत़ त्यांचा समाजात दोन गट पाडण्याचा डाव हाणून पाडू़ तसेच मराठा-ओबीसी भांडणे लावण्यासाठी काही पुढारी टपूनच बसले आहेत त्याला बळी पडू नका, असे आवाहनही खा. संभाजीराजे यांनी केले़