Navneet Rana: “बाळासाहेबांचा विसर पडला का? मला कोणी रोखू शकत नाही”; राणांचा शिवसेनेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:35 PM2022-04-21T15:35:26+5:302022-04-21T15:37:06+5:30
Navneet Rana: मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. ही दुहेरी ताकद माझ्या पाठिशी आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी सरकारला ३ मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. यावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. यातच आता अमरावतीच्या खासादर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे म्हटले आहे. यावरून शिवसैनिक आणि युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. यासंदर्भात बोलताना, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसेनेला विसर पडला आहे का, अशी विचारणा करत, मला कोणी रोखू शकत नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दर्शवत हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या घरातच हनुमान चालीसा पठण करावे, असा खोचक टोला त्यांनी लगावला होता. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी येत्या २३ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान अर्थात मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
तुम्हाला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे का?
तुम्हाला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे का? आम्ही धमकी देणारे लोक नाही. आमच्या रक्तात धमकी देणे नाही. पण काही शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला खुली धमकी दिली. त्यांनी म्हटले ज्या पायांवर तुम्ही येत आहात, त्या पायांवर तुम्हाला जाऊ देणार नाही. पण मी त्यांना सांगते की, मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. ही दुहेरी ताकद माझ्या पाठिशी आहे. मला कुणीच थांबवू शकत नाही, असा पलटवार राणा यांनी केला.
आम्ही हनुमान चालीसा तिथे म्हणणार हे नक्की आहे
ज्याच्यात ताकद असेल त्यांनी वेळ दिला नाही म्हणून आम्ही वेळ दिला की आम्ही कोणत्या तारखेला तिथे येऊन हनुमान चालीसा पठण करणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही मुंबईत जाणार आहोत. आमचे बहुतेक कार्यकर्ते तिथे पोहोचणार आहेत. आम्ही हनुमान चालीसा तिथे म्हणणार हे नक्की आहे, असा ठाम निर्धार राणा यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंमुळेच आजचे संकट ओढवले आहे, अशी टीका राणा यांनी केली.