लढायचे असेल तर कमळ चिन्हावर लढा अन्यथा...; विनायक राऊतांचा दावा, शिंदेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 01:23 PM2024-01-12T13:23:20+5:302024-01-12T13:24:04+5:30
सध्या राज्यातील जनतेमध्ये जो काही रोष आहे त्याचं प्रत्यक्ष रुपांतर निवडणुकीच्या मतदानातून दिसून येईल असंही विनायक राऊतांनी म्हटलं.
रत्नागिरी - महाराष्ट्रात गद्दार गट, अजित पवार गट आणि भाजपामध्ये जागावाटपावेळी एकमेकांच्या उरावर बसण्याचा प्रयत्न नक्की होणार आहे. भाजपा गद्दार गटाला फेकून देणार आहे. लढायचे असेल तर कमळ चिन्हावर लढा अन्यथा आम्ही आमचा उमेदवार उभा करू अशाप्रकारे भाजपा शेवटचा डाव टाकणार आहे. त्यामुळे कितीही बसले तरी महाविकास आघाडीच्या ३५ हून अधिक जागा निवडून येतील असा दावा खासदार विनायक राऊतांनी केला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, कोकणासह राज्यातील अनेक मतदारसंघात शिंदे गटाच्या खासदारांना लढायचे असेल तर कमळावर लढा असं म्हटलं गेले आहे. त्यात मावळ, रामटेक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, हातकणंगले सगळीकडे भाजपाचे उमेदवार उभे राहतील असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवडी-न्हावा प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत अधिक गती मिळाली. नारळ फोडण्याचे श्रेय ते घेतील. निवडणुकीसाठी आता जास्त दिवस नाहीत. १५ फेब्रुवारीनंतर आचारसंहिता कधीही लागेल. त्या अगोदर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मोदींचा वापर केला जातो. तो वापर महायुतीला फलदायी ठरणार नाही. सध्या राज्यातील जनतेमध्ये जो काही रोष आहे त्याचं प्रत्यक्ष रुपांतर निवडणुकीच्या मतदानातून दिसून येईल असंही विनायक राऊतांनी म्हटलं.
१० जानेवारी लोकशाहीसाठी काळा दिवस
देशाच्या लोकशाहीत १० जानेवारी काळा दिवस मानला गेला पाहिजे. संविधानाची तोडमोड करायचं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही कसं पायदळी तुडवायचे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवून दिले आहे. राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल केवळ उद्धव ठाकरेंसाठी नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाला नेस्तनाबूत करण्याचा निकाल आहे. राज्यातील मराठी माणसांचे अस्तित्व संपवायचे आणि सर्वांना अहमदाबाद आणि सूरतेचे गुलाम बनवायचे. महाराष्ट्राला सूरत आणि अहमदाबादची गुलामी करायला लावायची हा कट होता आणि या कटात दुर्दैवाने राज्यातील गद्दार गट सामील झाले. छत्रपतींच्या स्वराज्याला जसा धोका निर्माण झाला होता तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे आज घडले आहे असं विनायक राऊतांनी आरोप केला.
दरम्यान, नार्वेकरांनी जे स्क्रिप्ट वाचन केले त्याचे सूतोवाच मंत्री दिपक केसरकरांनी लावले होते. निकाल वाचनाची वेळ ४.३० ची असतानाही प्रत्यक्ष निकाल वाचन ५.३० ला झाले. कारण त्याचवेळी हिंगोलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू होते. हे भाषण लाईव्ह करण्याची संधी त्यांना दिली. त्यामुळे हे पोपटपंची कुणाची करतायेत हे दिसून आले असंही राऊतांनी सांगितले.