मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेचा नवा पॅटर्न २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला केली आहे.
परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला. हा नवा पॅटर्न २०२३ पासून लागू केला जाणार आहे. मात्र, यानुसार तयारीसाठी वेळ मिळणार नसल्याने उमेदवारांनी याला जोरदार विरोध केला. पुण्यात यासंदर्भात उमेदवारांनी आंदोलन केल्यानंतर याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली. आयोग यावर तातडीने निर्णय घेऊन लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.
एमपीएससी अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील अनुशेष कमी करण्याचे काम वेगाने केले आहे. नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचे नियोजनही झाले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्र्यांचेही फाेनवर आश्वासनपुणे : मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने (डिस्क्रिप्टिव्ह) २०२५ नंतर घेण्याबाबत राज्य सरकार अनुकूल असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी शहरातील टिळक चौकात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.