MSEBचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रमेश सहस्रबुद्धे यांचे निधन
By admin | Published: December 28, 2016 09:55 PM2016-12-28T21:55:23+5:302016-12-28T21:55:23+5:30
प्रसिद्ध साहित्यिक, विज्ञानकथा लेखक रमेश सहस्रबुद्धे यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - प्रसिद्ध साहित्यिक, विज्ञानकथा लेखक रमेश सहस्रबुद्धे यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आजवर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर एकूण 76 पुस्तके लिहिली आहेत.
अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांनी लेखन केले असून,त्यांनी लिहिलेल्या विज्ञान-कुतुहल, प्राणी-पक्षी निरीक्षण, बोधकथा, वैज्ञानिकांचे आणि थोरांचे किस्से प्रसिद्ध झाले आहेत. "प्रभात'च्या दिवाळी अंकात आणि "प्रभात'ने राबवलेल्या "ऑल राउंडर' या उपक्रमातही त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ते राज्यातील पहिले मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. अनेक वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले असून, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून देखील त्यांची व्याख्यानमाला प्रदर्शित झाली आहे. टेलिव्हिजन आणि विज्ञानसागरातील दीपस्तंभ या त्यांच्या दोन विज्ञानविषयक पुस्तकांना राज्यपुरस्कार लाभला असून, यातील एकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या इतर दोन पुस्तकांस बालकुमार साहित्य पुरस्कारही मिळाला आहे. विविध योजनांसाठी त्यांची पुस्तके लागली आहेत. रोहा येथे 1987 मध्ये झालेल्या विज्ञान परिषदेच्या संमेलनात त्यांच्या विज्ञानविषयक लेखन कार्याचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. गोवा पाठ्यपुस्तक मंडळाने आठवीच्या पुस्तकात रमेश सहस्रबुद्धे यांचा धडा समाविष्ट केला अूसन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या टी. वाय. बी. ए.च्या अभ्यासक्रमासाठी त्यांच्या एका लेखाचा समावेश करण्यात आला आहे. मराठी विज्ञान परिषदेमार्फत काढल्या जाणाऱ्या पत्रिका व मासिकाच्या संपादक मंडळात त्यांचा काही काळ समावेश होता. "विज्ञानयुग' या पुण्यात प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाचे ते अनेक वर्षे सल्लागार मंडळावर होते. निगडीतील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर "ऍस्कॉप' या पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते तीन वर्षे उपाध्यक्ष होते. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक संघांचा महासंघ "फेस्कॉम'च्या प्रादेशिक विभागाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.