महावितरण करणार वीजबिलांत दुरुस्ती; राज्यातील प्रत्येक तालुक्यात १० मार्चपासून शिबिर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 06:07 AM2022-03-10T06:07:08+5:302022-03-10T06:07:30+5:30
कालावधी १० मार्च ते ३१ मार्च कालावधीत राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढत्या वीज बिलाच्या तक्रारी, ग्राहकांची नाराजी, बिल भरण्यात येणाऱ्या अडचणी आणि वारंवार संपर्क साधूनही ग्राहकांचा प्रश्न सुटत नसल्याने आता महावितरण बिलांच्या दुरुस्ती करण्याबाबत सरसावले आहे. कृषी वर्गवारीतील ग्राहकांच्या वीज बिलांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरण तर्फे १० मार्चपासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
कालावधी १० मार्च ते ३१ मार्च कालावधीत राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.
शिबिरांचा फायदा
ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. कृषी ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजुरीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करुन देयक दुरुस्ती नंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला कळेल.
थकबाकी
१) महावितरणच्या एकूण थकबाकीपैकी सप्टेंबर २०२० अखेर कृषी ग्राहकांकडे ४५,८०२ कोटी थकबाकी झालेली आहे.
२) कृषी ग्राहकांच्या हितासाठी शासनाने त्यामुळे सर्व समावेश कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० जाहीर केले होते.
३) धोरणा अंतर्गत निर्लेखनाद्वारे १०,४२० कोटी सूट, व्याज व विलंब आकारामध्ये ४,६७६ कोटी सूट दिल्यानंतर सुधारीत थकबाकी ३०,७०६ कोटी निर्धारित करण्यात आली आहे.
४) त्यापैकी फक्त २,३७८ कोटी रकमेचा भरणा कृषी ग्राहकांद्वारे करण्यात आलेला आहे.
५) सप्टेंबर २०२० पासून चालू वीज देयकाच्या थकबाकीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आज थकबाकी ३९,९९३ कोटी आहे.