रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन हस्तांतरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, जिल्ह्यातील समाविष्ट पाच तालुक्यांमधील एकूण ९४.४ टक्के जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. खेडमध्ये १०० टक्के ताबा देण्यात आला आहे. या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, अशा जमीनमालकांना भूसंपादन संस्थेकडून शासकीय दराच्या सुमारे चारपट भरपाईची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८० टक्के भरपाई रकमेचे (१४५० कोटी) वाटप झाले आहे.
मुंबई - गोवा महामार्ग देशातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. पनवेल, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी ही या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाची शहरे आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीनही जिल्हे जोडणारा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा असा महामार्ग जानेवारी २०१९ सालापर्यंत पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड ते राजापूर या सहा तालुक्यांमधील २०५.५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १०२ गावांमधील एकूण ४१५.८७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. २९,८५३ खातेदार या मोबदला वाटपासाठी पात्र आहेत.
यासाठी भूसंपादन संस्थेकडून २०४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत १८२८ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, १४५० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होण्यासाठी दीड - दोन वर्षाचा कालावधी गेला असला, तरी भूसंपादन संस्थेकडून मोबदल्याची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे फेब्रुवारी २०१७मध्ये प्राप्त झाली होती. सध्या या सहाही तालुक्यांमध्ये मोबदला वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मोबदला वाटपाचे कामही ८० टक्के पूर्णत्त्वाला गेले आहे. २० टक्के निधी वाटपाचे काम खातेदारांच्या वादामुळे रेंगाळले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया आता पूर्णत्त्वाकडे जावू चालली आहे. ४२२.५१पैकी जिल्हा प्रशासनाने ४१५.२७ हेक्टर क्षेत्र संपादित केले असून, ३९२.५७ हेक्टर (९४.४ टक्के) क्षेत्राचा ताबा महामार्ग प्राधिकरणकडे देण्यात आला आहे. तर उर्वरित ५.६ टक्के जमिनीचा ताबाही लवकरच देण्यात येणार आहे. महामार्ग चौपदरीकरण प्रक्रियेतील अडथळे दूर झाल्याने पुढील प्रत्यक्ष कामाला आता वेग येणार आहे.
४१५.८७ हेक्टर क्षेत्र संपादितमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणात भूसंपादनाचा मोठा अडथळा होता. मात्र, तो आता बहुतांशी प्रमाणात दूर झाल्याने चौपदरीकरणाचे काम वेगात सुरु होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ४१५.८७ हेक्टर क्षेत्राचे यासाठी संपादन करण्यात आले आहे.