मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार, रेल्वे रूळावर पाणी जमून वाहतुकीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 11:46 AM2017-08-19T11:46:54+5:302017-08-19T12:05:09+5:30
मुंबईमध्ये पूर्व-पश्चिम उपनगरात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.
मुंबई, दि. 19- मुंबईमध्ये पूर्व-पश्चिम उपनगरात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळी रिमझिम पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईबरोबरच नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसंच रायगडमधील उरण तालुक्यात गेल्या चार तासांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. चिरनेर गावातील रस्त्यांवर दीड ते दोन फूट पाणी भरल्याची माहिती मिळते आहे.
मुंबई पूर्व उपनगरांत पावसाचा जोर वाढला असून, भांडूप आणि कांजुर मार्गदरम्यान रेल्वे रुळावर पाणी आलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिट उशिराने होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भांडूप ते कांजुरमार्ग मार्गदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्याने, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिट उशाराने सुरु आहे.
राज्यात आठवड्याच्या शेवटच्या म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. वेधशाळेच्या अंदाजानुसार विशेष म्हणजे मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
विदर्भात पावसाचं पुनरागमन
विदर्भाच्या काही भागात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसंच रविवारीसुद्धा विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागपूर शहरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी रात्री तीन तासात 141.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजही विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भंडाऱ्यातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय.
गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पावसामुळे सर्वसामान्य नागरिकही सुखावला आहे. अजून काही दिवस असाच पाऊस पडला तर बळीराजाच्या चिंता दूर होतील.