कर्जत थांबा रद्द करूनही मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:28 AM2019-06-20T04:28:30+5:302019-06-20T04:28:58+5:30
प्रवाशांचे हाल; पुश-पूल इंजिनानंतरही नियोजित वेळेत पोहोचणे अवघड
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन आणि कर्जत थांबा रद्द करूनदेखील ती उशिराने पोहोचत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी पूश-पूल इंजीन बसविण्यात आले. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करतेवेळी साधारण ३ तास १५ मिनिटांचा प्रवास, पूश-पूल इंजीन बसविल्याने २ तास ३५ मिनिटांत होण्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला. मात्र १२ जून ते १७ जूनपर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेसला विलंब होत आहे. कर्जत थांबा रद्द केल्याने कर्जतहून पुणे प्रवास करणाºया प्रवाशांचे हाल झाले आहेत.
इंटरसिटी एक्सप्रेसला पूश-पूल इंजीन बसविल्याने ३० ते ४० मिनिटांची बचत होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पुण्याला इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र चाचणीच्या पहिल्या दिवशी १२ जूनला सकाळी १० वाजून ०६ मिनिटांनी, १३ जूनला सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी, १४ जूनला सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी, १५ जूनला सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी, १६ जूनला सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी आणि १७ जूनला सकाळी ९ वाजून ४६ मिनिटांनी इंटरसिटी एक्स्प्रेस पुण्याला पोहोचते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अपेक्षित वेळेच्या १० ते ३६ मिनिटांचा उशीर चाचणीच्या वेळेत झाला
आहे.
मुंबई ते पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये गर्दी वाढली
इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन लावल्याने कर्जतचा तांत्रिक थांबा रद्द केल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. कर्जतहून पुण्याला जाण्यासाठी इंटरसिटी एक्स्प्रेसचा वापर केला जात होता. यातून दररोज तब्बल तीनशेहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. मात्र कर्जत थांबा रद्द केल्याने आता इंटरसिटीनंतर येणाºया मुंबई ते पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कर्जत थांबा रद्द केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.