मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालक मध्यरात्रीपासून जाणार संपावर
By admin | Published: August 28, 2016 04:08 PM2016-08-28T16:08:58+5:302016-08-28T16:18:54+5:30
ओला, उबरवर यांच्या सेवेवर कडक निर्बंध घालावेत, यासाठी टॅक्सींच्या संघटनांसह रिक्षा युनियननंही थेट संपावर जाण्याचा इशारा दिला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - ओला, उबरवर यांच्या सेवेवर कडक निर्बंध घालावेत, यासाठी आंदोलनाचे शस्त्र उपसूनही सरकार लक्ष देत नसल्याने आता काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या संघटनांसह रिक्षा युनियननंही थेट संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ओला उबर टॅक्सींच्या निर्बंधासह अन्य मागण्यांसाठी मुंबईतल्या मुख्य रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं रिक्षा-टॅक्सी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचा पुढचा आठवडा जिकिरीचा जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. आज मध्यरात्रीपासून जयभगवान रिक्षा-टॅक्सी संघटनेनं संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तर 30 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुंबई ऑटोमेन्सच्या रिक्षा आणि टॅक्सी संपावर जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. दुसरीकडे 31 ऑगस्टपासून बेस्टचे कर्मचारीही संपावर जाणार असल्यानं पुढचा आठवडा हा मुंबईकर प्रवाशांसाठी जिकिरीचा ठरणार आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बेस्टच्या संपात मुंबईकर वेठीस धरला जाणार आहे.
ओला, उबर कंपन्यांना एजंटचे काम करू देऊ नये, तसेच स्थानिक प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी देऊ नये, अशा मागण्या मुंबई टॅक्सीमेन्स युनियनसह अन्य काही संघटनांनी याचिकांद्वारे कोर्टातही केली आहे. याचिकांनुसार, ओला उबर एजंटची भूमिका पार पाडत आहेत. एजंट म्हणून काम करण्यासाठी आरटीओकडून परवाना घ्यावा लागतो. मात्र, या दोन्ही कंपन्यांकडे तो परवाना नाही. त्यामुळे ओला, उबरच्या टॅक्सी बेकायदेशीरपणे रस्त्यावरून धावत आहेत. या टॅक्सींना टुरिस्ट परवाना असतानाही, त्या स्थानिक प्रवाशांची ने- आण करून या टॅक्सी काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या पोटावर पाय आणत आहेत.
(ओला, उबरच्या टॅक्सींवर निर्बंध घाला)
काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी भाड्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तथापि, ओला, उबर प्रवाशांकडून मनमानीपणे भाडे आकारले जात आहे. त्याशिवाय या टॅक्सींमधून प्रवास करणे महिलांसाठी धोकायदायक ठरत आहे. टॅक्सी चालकाला परवाना देण्यापूर्वी पोलिसांकडून चालकाच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते, पण ओला, उबर टॅक्सीचालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत नाही किंवा त्याच्या ठावठिकाण्याचीही माहिती घेण्यात येत नाही, असंही मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे म्हणणे आहे.