लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ट्रायडेंट हॉटेल येथे बुधवारी पार पडलेल्या बैठकीतही जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. जागा वाटपासंदर्भात आता पुढील निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात दोन दिवसांत होणाऱ्या अंतिम बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, आजची बैठक ही जागा वाटपाची शेवटची बैठक होती. यापुढे एकही बैठक होणार नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अंतिम बैठक होईल. तीनही पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते.
२७ जागांची वंचितची मागणी नाहीआम्ही सर्वांना सविस्तर प्रत्येक जागेवर चर्चा केली. कोण कुठे जिंकेल यावर चर्चा केली. जिंकणे महत्त्वाचे आहे. कोण किती जागा लढतेय याला महत्त्व नाही. प्रकाश आंबेडकर यांचीसुद्धा हीच भूमिका आहे. त्यांनी २७ जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही, असे राऊत म्हणाले.