माझी कृषी योजना : शेतीनिष्ठ पुरस्कार योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:58 AM2018-12-11T11:58:23+5:302018-12-11T11:58:29+5:30
शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
शेतीनिष्ठ पुरस्कार योजना १९६७ सालापासून सुरू करण्यात आलेली आहे. शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांनी स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पद्धतीने पीक लागवड करणे तसेच जवळपासच्या शेतकऱ्यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, शेतीपूरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाडे, निलगिरी, सुबाभूळ आदींची लागवड करणे, शासन, सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर तसेच वेळेवर कर्जाची परतफेड आदींमध्ये उल्लेखनीय कार्य असलेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
दरवर्षी आदिवासी गटासह २५ शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सदर व्यक्तीचा सपत्नीक सत्कार हे पुरस्काराचे स्वरूप आहे. कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती राज्यभरातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.