राज्यामध्ये शेळी-मेंढी पालन व्यवसाय हा प्रमुख ग्रामीण व्यवसाय आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या मांसाचे वाढते भाव, त्यामुळे खात्रीची बाजारपेठ एकापेक्षा अधिक करडे देण्याची क्षमता, इतर रवंथ करणाऱ्या जनावरांपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या लवकर वयात आणि वजनास येण्याची क्षमता इ. बाबींमुळे, सुशिक्षित बेरोजगार युवक, प्रगतिशील शेतकरी या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत.
शासन, बँका, विविध समाज विकास महामंडळ, विविध शासकीय विभाग दारिद्र्य निर्मूलन, स्वयंरोजगार निर्मिती, पैदास- सुधारणा इ. विविध कार्यक्रमांतर्गत कर्ज आणि अर्थसहाय्य देत असतात. लाभार्थ्याला व्यवसाय सुरू करताना शास्त्रीय पायावर उभा राहा तसेच फायदेशीर व्हावे, याकरिता विविध वित्तीय संस्था या व्यवसायाला कर्ज देताना ‘शेळी-मेंढी पालन प्रशिक्षण’ प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालतात. या सर्व बाबींचा विचार करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर शेळी- मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येते.