नागपूर-मुंबई भाडे २५ हजार
By admin | Published: October 30, 2014 12:44 AM2014-10-30T00:44:58+5:302014-10-30T00:44:58+5:30
नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी एअरलाईन्स कंपन्या सज्ज असून, ३१ला मुंबईत होणाऱ्या शपथविधी सोहळ््यासह विविध राजकीय घडामोडींना हेरून
एअरलाईन्स कंपन्यांची मनमानी : प्रवाशांच्या खिशाला कात्री
नागपूर : नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी एअरलाईन्स कंपन्या सज्ज असून, ३१ला मुंबईत होणाऱ्या शपथविधी सोहळ््यासह विविध राजकीय घडामोडींना हेरून कंपन्यांनी या कालावधीत मनमानी भाडे वाढवले आहे. त्यामुळे प्रत्येकाला २२ ते २५ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
मागील आठ दिवसांपासूनच विमानाचे भाडे वाढले आहे. इकडे रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना विमान प्रवासाकडे वळावे लागत आहे. २३ तारखेला दिवाळी सुरू झाली. त्यामुळे ३ ते ४ दिवसांपूर्वी मुंबई, दिल्ली, पुणे येथून येणाऱ्या सर्वच फ्लाईट फुल्ल होत्या. परिणामी तिकिटांचे दर आणखीनच वाढले. यात निवडणुका आटोपल्यानंतर नागपुरातील मुख्यमंत्री होणार असल्यामुळे राजकीय नेत्यांच्या मुंबईवाऱ्या वाढल्या हेसुद्धा एक मोठे कारण आहे. दिवाळीनंतर २५ आणि २६ आॅक्टोबरनंतर पुन्हा प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू झाला. काही प्रवाशांनी १५ दिवसांपूर्वीच विमानाचे तिकीट खरेदी केलेले असल्यामुळे मुंबई, दिल्ली आणि पुण्याला जाणारी सर्वच विमाने फुल्ल झाली होती. उरल्यासुरल्या सीटसाठी विमान कंपन्यांनी मनमानी भाडे वसूल केल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. बुधवारची स्थिती पाहता जेटलाईटच्या सायंकाळच्या ५.१० वाजताच्या विमानाचे प्रवासभाडे २२ हजार आकारण्यात आले. इतर सर्व विमाने फुल्ल होती. उद्या गुरुवारी सायंकाळी ५ वाजता जेटच्या विमानाचे भाडे १० हजार ७८० रुपये आकारण्यात येत आहे. सकाळी ७.५५ वाजता असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे भाडे १२ हजार ४०० आकारण्यात येत आहे तर गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या इंडिगोच्या विमानाचे भाडे १२ हजार ६०० रुपये, गो एअरच्या ८.२० वाजताच्या विमानाचे भाडे १४ हजार ६०० रुपये आकारण्यात येत आहे. त्यानंतर ३१ आॅक्टोबरला मुंबईसाठी ८ हजार रुपये, २ नोव्हेंबरला ५ हजार ५०० रुपये आकारण्यात येत असल्याची माहिती रामदासपेठमधील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांनी दिली. मात्र, या दिवशीही वेळेवर तिकीट काढणाऱ्यांच्या खिशाला २५ हजारापर्यंतची कात्री लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती विमान प्रवास करणाऱ्यांनीच दिली. दिवाळी आणि राजकीय घडामोडींमुळे प्रवाशांना प्रवासासाठी चांगलीच किंमत मोजावी लागली असून आगामी काही दिवसात विमानाचे दर पूर्ववत खाली येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)