नागपूर : दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात अडकवल्यानंतर तिला पळवून नेऊन एका आरोपीने सलग दोन दिवस तिच्यावर स्वत: अत्याचार केला. तर, त्याच्या दोन मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने तिला घरी सोडून पळ काढला. पीडित मुलीच्या पालकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी केवळ बलात्काराचा गुन्हा दाखल केला अन् रात्रीपर्यंत त्याबाबत माहिती देण्याचे टाळल्याने नंदनवन पोलीस आरोपींच्या पिंज-यात सापडले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव विजय (२२) आहे. तो नंदनवनमधील शास्त्रीनगरात राहतो. त्याच्या घराशेजारी १५ वर्षीय विद्यार्थिनी राहते. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. गरीब परिवारातील या मुलीला आरोपी विजयने थोडीफार आर्थिक मदत करून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तिला प्रेमपाशात ओढले. सोमवारी दुपारी १ वाजता तिला दुचाकीवरून बसवून फिरवले. त्यानंतर स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा कुंभारटोलीतील एका मित्राच्या रूमवर नेऊन सलग दोन दिवस अत्याचार केला. संधी साधून त्याच्या दोन मित्रांनीही नंतर तिच्यावर अत्याचार केला. बुधवारी दुपारी १२ वाजता आरोपीने तिला घरी सोडून दिले आणि पळून गेला. दोन दिवस बेपत्ता मुलीच्या शोधात अस्वस्थ झालेल्या पालकांनी तिला विचारणा केली असता हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर पालकांनी मुलीला नंदनवन ठाण्यात नेले. मुलीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण बलात्काराचे नव्हे तर सामुहक बलात्काराचे असल्याची जोरदार चर्चा पसरल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली.
पोलिसांचे उलटसुलट प्रश्न
अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि सामुहिक बलात्काराचे हे प्रकरण नंदनवन पोलिसांनी प्रारंभी फारच सहजतेने घेतले. पालकांना आणि तिला उलटसुलट प्रश्न करून हुसकावण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते. मुलीच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वरिष्ठांकडे जाण्याचा पवित्रा घेतल्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरण आणि बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचे पूर्ण नाव सांगण्यासही टाळाटाळ केली. माहिती कक्षातही आरोपीचे पूर्ण नाव कळविले नाही. रात्री सामुहिक बलात्काराची चर्चा पसरल्यानंतर गुन्हा दाखल करणाºया पोलीस उपनिरीक्षकांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.