नागपूर, खान्देशात बंदचे हिंसक पडसाद, ‘भारत बंद’ला राज्यात अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:08 AM2018-04-03T05:08:16+5:302018-04-03T05:08:16+5:30
अॅट्रॉसिटी कायदा शिथील करण्याच्या निषेधार्थ सोमवारी पुकारण्यात भारत बंदला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला. नागपूर तसेच खान्देशातील काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या.
मुंबई/नागपूर - अॅट्रॉसिटी कायदा शिथील करण्याच्या निषेधार्थ सोमवारी पुकारण्यात भारत बंदला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला. नागपूर तसेच खान्देशातील काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या.
नागपुरात सकाळपासून शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला दुपारी अचानक हिंसक वळण लागले. दुपारी १२ वाजता इंदोरा चौकातून युवकांनी मोर्चा काढून दुकाने बंद करायला लावली. कमाल चौक , पाचपावली रोडवर युवकांनी मोर्चा काढून दुकाने बंद केली. इंदोरा चौकात युवकांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत टायर जाळले. जरीपटका मार्केटही बंद करण्यात आला. युवकांच्या टोळीने नारा रोड इंदोरा मैदानाजवळ स्टार बस रोखली व त्याच्या दोन सीटला आग लावली. त्यानंतर काही युवकांनी कामठी रोडवरहील दहा नंबर पुलाकडे धाव घेतली. तेथील एका पेट्रोल पंपावर दगडफेक करून पंप बंद पाडला. या दगडफेकीत पेट्रोल पंपावर काम करणारी एक महिला जखमी झाली.
खान्देशात जळगाव जिल्ह्यात दगडफेकीत तीन जण जखमी झाले तर शहादा (जि. नंदुरबार) येथे आंदोलकांनी पाच बसवर दगडफेक केली. धुळे जिल्ह्यात पिंपळनेर, निजामपूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धुळे व कुसुंबा येथे रास्तारोको करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहाद्यात चार तर तालुक्यात एक अशा पाच बसेस फोडण्यात आल्या. नंदुरबारसह नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा येथे कडकडीत बंद होता. तर शहाद्यात सकाळी साडेसहा ते आठ वाजेच्या दरम्यान चार एसटीवर दगडफेक करण्यात आली.
दादरमध्ये शांततेत निघाला निषेध मार्च
मुंबई : देशात भारत बंदला हिंसक वळण लागले असले, तरी मुंबईत मात्र शांतपणे निषेध मार्च काढून आंबेडकरी जनतेने आपला रोष व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रोसिटी अॅक्ट शिथिल करण्यासंदर्भात दिलेल्या निकालाविरोधात आंबेडकरवादी संघटनांसह डाव्या पक्षांनी सोमवारी दादरमध्ये निषेध मार्च काढत घोषणाबाजी करत आंदोलन केले.
वीर कोतवाल उद्यानापासून निघालेल्या या निषेध मार्चमध्ये हजारो आंबेडकरवादी कार्यकर्ते एकत्रित आले होते. चैत्यभूमी परिसरात येईपर्यंत आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या निषेध मार्चमध्ये जाती अंत संघर्ष समिती, संविधान संवर्धन समिती, जनवादी महिला संघटना, एसएफआय, युवा क्रांती सभा, डीवायएफआय, सीआयटीयु, राष्ट्र सेवा दल, शेकाप, जनता दल, माकप, भाकप, भारिप, पी.एस.एफ, एफएसयुआय, भीम आर्मी, नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस, आदी सर्व आंबेडरी, पुरोगामी डाव्या पक्ष या संघटनांनी सहभाग घेतला होता. आक्रमक घोषणा देणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी शांतपणे आपल्या मागण्या मांडल्या. दरम्यान, दादरसह मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यकर्त्यांनी दादरमध्ये एकत्र येत निषेध व्यक्त करून आंदोलनाची सांगता केली.
संघाबाबतचा अपप्रचार
दुर्भाग्यपूर्ण - भय्याजी जोशी
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ‘अॅट्रॉसिटी’ कायद्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात होणारा हिंसाचार अयोग्य आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयावरून संघाच्या संदर्भात सुरू असलेला अपप्रचार दुर्भाग्यपूर्ण आहे. न्यायालयाच्या त्या निर्णयाशी संघाचा सुतराम संबंध नाही, असे स्पष्टीकरण संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिले आहे.
संघातर्फे एक पत्रक सोमवारी जारी करण्यात आले आहे. समाजातील बुद्धिवंतांनी परस्पर सामंजस्य व स्नेहभाव अबाधित राहावा, यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच कुणाच्याही भडकवण्यात न येता नागरिकांनी सामाजिक प्रेम, सौहार्द आणि विश्वास कायम ठेवावा. कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन संघाने केले आहे.
संघ कायम जातीच्या आधारावर होणाºया अत्याचारांचा विरोध करीत आला. अशाप्रकारचे अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी ‘अॅट्रॉसिटी’सारख्या कायद्यांचे पालन झाले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अगदी योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.