नागपुरी संत्री आता दुबईतही! वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे फलित, महिनाभरात पाच कंटेनर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:34 AM2018-01-12T01:34:07+5:302018-01-12T01:34:25+5:30
नागपुुरात अलिकडेच पार पडलेल्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये आलेल्या परदेशातील व्यापा-यांना नागपुरी संत्र्याने चांगलीच भुरळ घातली. आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या ग्राहकांना आकर्षित करणा-या नागपुरी संत्र्याला दुबईतून मोठी मागणी आली आहे.
वर्धा : नागपुुरात अलिकडेच पार पडलेल्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये आलेल्या परदेशातील व्यापा-यांना नागपुरी संत्र्याने चांगलीच भुरळ घातली. आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या ग्राहकांना आकर्षित करणा-या नागपुरी संत्र्याला दुबईतून मोठी मागणी आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच लोकमतच्या सहकार्याने नागपुरात नुकतेच ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देश-विदेशातील कृषी तज्ज्ञांनी संत्रा उत्पादन, विक्री व मार्केटिंगवर मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी उपस्थिती नोंदवीत नागपुरी संत्र्याला जगाची बाजारपेठ कशी मिळवून देता येईल, यावर विचारमंथन केले होते. त्याचे फलीत आता दिसू लागले आहे.
मोर्शी येथे असलेल्या श्रीधर ठाकरे यांच्या संत्रा प्रक्रिया केंद्रातून दुबई येथे काही संत्रे चवीकरिता पाठविण्यात आली होती. ती दुबईकरांनी एवढी आवडली की व्यापाºयांनी आॅर्डरच देऊन टाकली. त्यानुसार आठवड्यात एक असे महिन्याकाठी पाच कंटेनर पाठविण्यात येणार आहेत. या प्रक्रिया केंद्रातून दिल्ली, केरळ, जम्मू आणि आता मुंबई येथे संत्री पाठविण्यात येत आहेत. विदेशात श्रीलंका आणि बांगलादेशात संत्री पाठविण्यात येत आहेत. याकरिता दिल्ली येथील दोन कंपन्यांना गे्रडनिहाय संत्र्याची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली असून आतापर्यंत ५८६ टन संत्री पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपुरी संत्री खरे ‘टेबल फूड’
विदेशात जाणाºया संत्र्यात पंजाबी संत्र्यांची अधिक मागणी आहे. मात्र ती संत्री सहज सोलून खाता येत नाहीत. ज्यूसकरिता ती फायद्याची ठरतात. या तुलनेत नागपुरी संत्री सहज सोलता येत असल्याने खाता येतात. म्हणूनच नागपुरी संत्री खरे ‘टेबल फूड’ असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
नागपुरात वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलसाठी संत्र्याचे मोठमोठे व्यापारी आले होते. ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकारात या फेस्टिव्हलची सर्वत्र चर्चा झाली. येथूनच नागपुरी संत्र्यांची देश-विदेशात एक ओळख निर्माण झाल्याने मोठी बाजारपेठ मिळण्याची अपेक्षा आहे.
- श्रीधर ठाकरे, संत्रा उत्पादक संघटनेचे नेते, मोर्शी.