नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची नोटीस उद्योग विभागाने काढलेली आहे. ती अद्याप रद्द करण्यात आलेली नाही. भूसंपादन भूधारकांच्या संमतीखेरीज करण्यात येणार नाही, अशी मािहती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. विशेष म्हणचे याआधी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नाणार येथील सभेत उद्योग विभागाने काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती.सदस्य हुस्नबानू खलिफे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प उभारला जाईल, अशी ग्वाही दिली. शिवसेनेचे अनिल परब म्हणाले, स्थानिक लोकांचा प्रकल्पाला विरोध आहे. ग्रामपंचायतीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा समृद्धी महामार्ग हाती घेतला तेव्हा त्यालाही विरोध झाला होता. विश्वासात घेतल्यानंतर लोक तयार झाले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने नाराज झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात नाणारच्या विरोधात घोषणा देण्याला सुरुवात केली. यावर ठरल्याप्रमाणे नारे द्यायचेच असेल तर द्या, अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सदस्य संजय दत्त म्हणाले, आमचा विकासाला विरोध नाही. पण या प्रकल्पामुळे प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होतील. प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.>तटकरेंना सरकार कसे चालते माहीत नाही ?विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात नाणार प्रकल्पावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना कोणत्या विभागाने काढली, मंत्री कोण होते, यासंदर्भात बैठक झाली होती का, असे प्रश्न उपस्थित केले. तटकरे यांचा रोख उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे असल्याने यावर नाराज झालेले शिवसेनेचे अनिल परब म्हणाले, तटकरे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते.असे असूनही त्यांना अधिसूचना कोणत्या विभागाकडून काढली याची माहिती नाही का?
नाणार जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 4:16 AM