नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरीला गावकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, ही रिफायनरी विदर्भात उभारावी, अशी विनंती ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारा केली आहे.नाणार येथील ग्रामस्थ व शिवसेनेचा या रिफायनरीला विरोध आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही रिफायनरी विदर्भात घेऊन जा, असे वक्तव्य केले आहे.नाणार प्रकल्पावरून या घडामोडी होण्याआधीच माजी खा. दर्डा यांनी ५ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही रिफायनरी विदर्भात उभारावी, अशी विनंती केली आहे. पत्रात दर्डा यांनी म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस व विमानाचे इंधन (एटीएफ) मुंबईहून रेल्वेद्वारे विदर्भात येते. याचा वाहतूक खर्च लीटरला ४ रुपये पडतो. त्यामुळे विदर्भात या इंधनांच्या किमती देशात सर्वाधिक आहेत. विदर्भात दरवर्षी १२ कोटी लीटर इतके इंधन लागते. विदर्भात रिफायनरी आली, तर वाहतुकीवर होणारा ४८,००० कोटी रुपयांचा खर्च वाचेल व इंधनही स्वस्त होईल.स्वस्तातील इंधन विदर्भानजीकच्या मध्य भारतातील १५ सिमेंट कारखान्यांना पुरविता येईल. याशिवाय नागपूर, जबलपूर व रायपूर ही तिन्ही विमानतळे या रिफायनरीशी पाइप लाइनने जोडता येतील व त्यांना स्वस्त एटीएफ पुरविता येईल. त्यामुळे विमान वाहतुकीला बळ मिळेल. विदर्भातील या रिफायनरीतून बहुमोल पेट्रो-केमिकल्सही मिळतील व त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग विदर्भात येतील आणि रोजगार उपलब्ध होतील. या रिफायनरीमुळे नागपूरच्या मिहान-एसईझेड प्रकल्पाला नवी ऊर्जा मिळेल.विदर्भातील रिफायनरीचे समर्थन करताना, दर्डा यांनी समुद्री बंदरापासून लांब असलेल्या बीना, मथुरा, पानीपत, भटिंडा व बटौनीमध्ये या पाच रिफायनरी सुरू असल्याचे नमूद केले आहे. या सर्व रिफायनरीज समुद्री बंदरांशी पाइपलाइनने जोडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च खूपच कमी झाला आहे. विदर्भातील रिफायनरीसुद्धा अशा प्रकारे मुंबई बंदराशी पाइपलाइनने जोडणे शक्य आहे व ही पाइपलाइन समृद्धी महामार्गाच्या बाजूला उभारता येईल, हेही नमूद केले आहे.सध्या भारतातील सर्व रिफायनरीजची क्षमता २४५ दशलक्ष टन आहे. २०३० पर्यंत ही क्षमता ४३९ दशलक्ष टनापर्यंत वाढवावी लागणार आहे. त्यामुळे नव्या रिफायनरीज उभ्या करणे क्रमप्राप्त आहे. त्यापैकी एक रिफायनरी महाराष्टÑ सरकारने विदर्भात उभारावी, अशी विनंती दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
विदर्भात रिफायनरी सहज शक्यजगातील सर्वात मोठी रिफायनरी, रिलायन्स उद्योग समूहाने जामनगर येथे उभारला आहे. या रिफायनरीची क्षमता ६० दशलक्ष टन आहे. रिलायन्स समूहाची जवळपास ५०० एकर जागा मौदा गावात आहे व तिथे रिलायन्स जियोचे दोन डेटा सेंटर्स काम करीत आहेत. या प्रकल्पाच्या आजूबाजूला हजारो एकर जमीन रिफायनरीसाठी अधिग्रहित करता येण्याजोगी आहे, त्या ठिकाणी खासगी रिफायनरी येऊ शकते.याशिवाय, सुमारे १० वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स उभे करण्यासाठी उमरेडजवळ सुमारे ५,००० एकर जमीन अधिग्रहित केली होती. हा प्रकल्प नंतर बारगळला, पण जमीन मात्र अजून कायम आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गापासून जवळ ही जमीन आहे. त्या ठिकाणी सरकारी रिफायनरी उभारणे शक्य आहे.