Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक दिवस आंदोलन सुरू होते. जालन्यात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे-पाटील यांनी काही मागण्या पूर्ण होण्यासाठी आग्रह धरला. अनेक मंत्री, नेते यांनी जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी १७ दिवसांनी उपोषण सोडले. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला बसवले होते, असा मोठा आणि गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना नाना पटोले मोठा दावा केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटू शकते, असे म्हटले जात आहे. सदर दावा करताना नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही आरोप केले आहेत. इंडिया आघाडीवरील बैठकीचे लक्ष वळवण्यासाठी जरांगे-पाटलांना उपोषणास बसवले. त्यानंतर गृहमंत्र्यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवले
जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होते. ३१ तारखेच्या मध्यरात्रीच आंदोलक संतप्त झाले. मात्र १ तारखेला तीन वाजता सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. याच दिवशी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. या बैठकीवरुन लक्ष वळवण्यासाठीच लाठीचार्जची घटना घडवली गेली.इंडिया आघाडीवरील बैठकीचे लक्ष वळवण्यासाठी जरांगे-पाटलांना उपोषणास बसवले. इंडिया आघाडीवरील लक्ष वळवण्याचे काम भाजप आणि येड्याच्या (EDA) सरकारने केले आहे, असे नाना पटोलेंनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलेले होते हे आता सिद्ध झालेले आहे. कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीसांनी माफीही मागितली. दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. जे मागास आहेत त्यांना न्याय मिळाले पाहिजे. कोणाच्या तोंडचा घास हिरावून नव्हे तर जातीनिहाय जनगणना करुन मिळाले पाहिजे. ओबीसींना २७ टक्के तसेच मराठा, धनगर यांना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून पुढे आरक्षण दिले पाहिजे, असे ठाम मत नाना पटोले यांनी मांडले.