Sanjay Raut vs Shiv Sena: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सामना'साठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. शिवसेनेत ऐतिहासिक बंड झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंपुढे पक्ष पुन्हा उभारण्याचे आव्हान आहे. अशा वेळी या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित करण्यात आला. या मुलाखतीवर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडकून टीका केली.
संजय राऊतांचा घेतला खरपूस समाचार
"संजय राऊत, तुम्ही उद्धव ठाकरेंना अक्षरश: उघडं पाडलं आहे. तुम्ही आधीच म्हणाला होतात की यांना रस्त्यावर आणेन, यांचे कपडे उतरवेन. आता जेवढे कपडे उतरवले तितके बास झाले. मी ज्या शिवसेनेत होतो, त्या पक्षप्रमुखाचे आता असलेले कपडे तरी कायम ठेव आणि दिल्या घरी तू सुखी राहा हे संजय राऊतांना माझं सांगणं आहे", असा सणसणीत टोला नारायण राणेंनी लगावला.
उद्धव ठाकरेंवरही सोडलं टीकास्त्र
"आपल्यासोबत असताना तो माणूस निष्ठावान आणि आपली साथ सोडली की तो गद्दार अशी शिवसैनिकाची व्याख्या उद्धव ठाकरे करतात. आता ते अडचणीत आहेत म्हणून कार थांबवून लोकांना भेटत आहेत. पण गेली अडीच वर्षे किंवा त्याआधी कधीच उद्धव ठाकरेंनी सामान्य शिवसैनिकाची विचारपूस केली नाही. त्यामुळे उद्धव यांच्या मनात शिवसैनिकांबद्दल नक्की किती प्रेम आहे हे माझ्याएवढं कोणीही ओळखत नाही. मातोश्रीची भिंत आणि त्याआत चालणारी प्रक्रिया मला चांगली माहिती आहे. त्यामुळे यांनी बढाया मारणं बंद केलं पाहिजे", अशी जहरी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
"उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना मराठी माणूस, हिंदुत्व आणि शिवसैनिक यांची आठवण होत आहे. त्यांची चिंता वाटत आहे. अडीच वर्ष सत्तेवर असताना त्यांना शिवसैनिक आठवला नाही. हिंदुत्त्व आठवलं नाही आणि मराठी माणूसही आठवलं नाही. आता मुलाखलीतून सविस्तर आपलं मत मांडत आहेत. सत्ता गेल्यानंतर तडफडणं म्हणतो, त्या भावनेतून एक केविलवाणा प्रयत्न, व्यथा या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी देशासमोर मांडली आहे", असा टोलाही त्यांनी लगावला.