'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:40 PM2024-11-23T21:40:32+5:302024-11-23T21:40:40+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.

Narendra Modi on Maharashtra Assembly Election 2024 : 'My best friend Devendra Fadnavis...', PM Modi congratulated after the resounding victory | 'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन

'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन

Narendra Modi on Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशाने भाजपमध्ये आनंदाची लाट आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. 'महाराष्ट्रात सुशासनाचा, सत्याचा विजय झाला आहे. देशात अन्य ठिकाणी देखील पोटनिवडणुका झाल्या. सर्वच राज्यांत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. देश फक्त आणि फक्त विकासाची मागणी करत आहे. मी देशाच्या जनतेचे आभार मानतो,' असं मोदी म्हणाले. 

महाराष्ट्रातील विजयाबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणतात, 'महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. आज महाराष्ट्रात लबाडी आणि फसवणूक पूर्णपणे पराभूत झाली आहे. राज्यात विकासाचा विजय झाला आहे. मी एकनाथ शिंदे, माझे परममित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन करतो. आज अनेक राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकालही आले आहेत. आमची लोकसभेची जागाही एकाने वाढली आहे. यूपी, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये लोकांनी भाजपला जोरदार पाठिंबा दिला आहे. आसामच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशातही आम्हाला यश मिळाले आहे. बिहारमध्येही एनडीएचा पाठिंबा वाढला आहे. देशाला आता फक्त विकास हवा आहे, हे यावरून दिसून येते. महाराष्ट्रातील मतदार, माता, भगिनी आणि युवक, शेतकरी बंधू-भगिनी आणि देशातील जनतेला मी आदरपूर्वक वंदन करतो.' 

महाराष्ट्राने सर्व विक्रम मोडले
'महाराष्ट्राने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कोणत्याही पक्षाचा किंवा आघाडीचा गेल्या 50 वर्षांतील हा सर्वात मोठा विजय आहे. सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राने भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडीला आशीर्वाद देऊन विजयी केले आहे. महाराष्ट्रात भाजप हा सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. हे निश्चितच ऐतिहासिक आहे. भाजपच्या शासनप्रणालीवर हा शिक्कामोर्तब आहे. महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस आणि त्यांच्या सर्व मित्रपक्षांपेक्षा एकट्या भाजपला जास्त जागा दिल्या आहेत. यावरून असे दिसून येते की, सुशासनाचा विचार केला तर देशाचा विश्वास फक्त भाजप आणि एनडीएवर आहे,' असंही मोदी यावेळी म्हणाले.

सलग तिसऱ्यांदा भाजपला जनादेश
'सलग तीन वेळा भाजपला जनादेश देणारे महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य आहे. याआधी आम्ही गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्य प्रदेशात सलग तीन वेळा विजय मिळवला आणि बिहारमध्येही एनडीएला सलग तीन वेळा जनादेश मिळाला आहे. 60 वर्षांनंतर तुम्ही मला तिसऱ्यांदा संधी दिली आहे, यावरुन आमच्या सुशासनाच्या मॉडेलवर जनतेचा विश्वास असल्याचे सिद्ध होते. मी जनतेला आश्वासन देतो की, आमचे सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहील. महाराष्ट्रातील जमिनीवर काम करणाऱ्या NDA कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे,' अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली. 

Web Title: Narendra Modi on Maharashtra Assembly Election 2024 : 'My best friend Devendra Fadnavis...', PM Modi congratulated after the resounding victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.