मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे एक विधान आता चर्चेत आले आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी गायब असलेल्या आमदारांमध्ये नरहरी झिरवाळ यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
नरहरी झिरवाळ यांनी १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता या बंडखोरांना १२ जुलैपर्यंत उत्तर देण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. सोबतच नरहरी झिरवाळ यांना नोटीस बजावली असून, उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
माझी छाती फाडली, तरी त्यात पवारसाहेबच दिसतील
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्या पहाटेच्या शपथविधीवेळी झिरवाळही राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह बेपत्ता झाले होते. अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीवेळी नरहरी झिरवाळ गायब होते. काही दिवसांनी ते थेट पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी अवतरले. माझी छाती फाडली, तरी त्यात पवारसाहेबच दिसतील, असे म्हणत निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना झिरवाळ यांनी गप्प केले होते. शरद पवार साहेब हे माझे दैवत आहेत. त्यांनी मला पाच वेळा उमेदवारी दिली. लोकसभा आणि विधानसभेला पराभव होऊन त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मी त्यांना दगा देणार नाही, विश्वासघात करणार नाही, असे झिरवाळ म्हणाले होते.
विधानसभा निवडणुकीत झिरवाळ शिवसेनेचा पराभव करुन आमदार
१९९९ पाठोपाठ २००४ च्या विधानसभा निवडणुकीत झिरवाळ शिवसेनेचा पराभव करुन आमदार झाले. हा त्यांचा सलग दुसरा विजय होता. मात्र २००९ मध्ये त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभवाचा धक्का बसला, परंतु २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी पराभवाचा वचपा काढला. त्यानंतर २०१९ मध्ये ते पुन्हा आमदार झाले. जागावाटपात विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले, त्यानुसार पवारांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्याला संधी दिली.