ट्रकचालकांचा देशव्यापी संप; दाेन दिवसांत राज्याला ५०० कोटींचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:12 AM2024-01-03T06:12:44+5:302024-01-03T06:19:21+5:30
संप अजूनही सुरू राहिल्यास राज्यातील मालवाहतुकीची स्थिती गंभीर होईल, अशी स्थिती आहे.
मुंबई : ट्रकचालकांच्या देशव्यापी संपात राज्यातील जवळपास १७ लाख ट्रक, टँकर, अवजड वाहने सहभागी झाल्याने अवघ्या दोन दिवसांत राज्याच्या अर्थव्यवस्थेला ५०० कोटींचा फटका बसल्याचा दावा वाहतूकदारांच्या संघटनेने केला आहे. भाजीपाला, फळे-फुले, धान्य, साखर, मसाले, बांधकामाचे साहित्य यांना मोठा फटका बसला आहे. संप अजूनही सुरू राहिल्यास राज्यातील मालवाहतुकीची स्थिती गंभीर होईल, अशी स्थिती आहे.
राज्यात १५ लाख, तर मुंबईत दोन लाख ट्रक आहेत. एका ट्रकमागे किमान ३,५०० रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपामुळे राज्याला साधारणतः ५०० कोटींचा फटका बसला आहे. तसेच ट्रकचालकांच्या संपामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ लागला असल्याची माहिती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी दिली.
ज्या शाळा मंगळवारी सुरू झाल्या, त्यांच्या बसही डिझेल मिळत नसल्याने धावू शकल्या नाहीत. राज्यातील मालवाहतूक ठप्प झाली हाेती. त्यासोबतच पेट्रोल-डिझेल वितरणावरही परिणाम झाला हाेता. संप आणखी काही काळ सुरु राहिला असता तर भाजीपाला, धान्य पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असता.
ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम पेट्रोल-डिझेल वितरणावर झाला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या संपामुळे कित्येक ठिकाणी पेट्रोल-डिझेल पोहोचू शकले नाही. त्यामुळे मुंबईतील २५० पैकी २२५ पेट्रोल पंप बंद करावे लागले. या आंदोलनाबाबत लवकरात लवकर तोडगा निघाला नाही, तर उद्या उर्वरित पेट्रोल पंप बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
- चेतन मोदी, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, मुंबई