"आम्ही पाठपुरावा करून मार्गी लावलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा नाट्य परिषदेचा केविलवाणा प्रयत्न.."
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:54 AM2020-10-03T11:54:34+5:302020-10-03T11:55:39+5:30
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षांचा आरोप
पुणे : ५९ व्या महाराष्ट्र हौशी राज्यनाट्य स्पर्धेतील सहभागी ४४५ नाट्य संस्थांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या निधी वाटपावर राष्ट्रवादी चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागानेच आक्षेप घेतला आहे. शासनाकडून या नाट्य संस्थाना अनुदान, निवास,प्रवास भत्ता, बक्षिसाची रक्कम, नाट्यगृह भाडे, तांत्रिक साहित्य भाडे आदी रक्कम देण्यास विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागाने सतत पाठपुरावा करून आता तो प्रश्न मार्गी लागतोय हे कळताच याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न नाट्यपरिषदेच्या कडून होत आहे ,असा आरोप राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.
नाट्यपरिषद नियामक मंडळाच्या सदस्य ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सविता मालपेकर यांनी देखील त्यास दुजोरा देत नाट्य परिषदेला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग या प्रश्नांचा गेल्या ६ महिन्यापासून पाठपुरावा करत आहे. ९ सप्टेबर रोजी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्य समन्वयक संतोष साखरे, मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम, प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, उपाध्यक्ष विजय पाटकर, सिनेअभिनेते सिद्धेश्वर झाडबुके,कौस्तुभ सावरकर, गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, प्रियदर्शन जाधव माया जाधव, शाम राऊत आदीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेवून या विषयी त्यांना निवेदन देवून हौशी कलावंतांची ही अडचण विशद केली होती. त्यावर अजित पवार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शासकीय पातळीवर या प्रश्नाला वेग आला. या पाठपुराव्यामुळे आता काही दिवसात महाराष्ट्राच्या हौशी नाट्य संस्थांना त्यांच्या खात्यात त्यांची अनुदान रक्कम शासनाच्या वतीने दिली जाणार आहे. मात्र नाट्यपरिषदेने हे श्रेय स्वतःच्या नावे लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. तो त्यांनी तात्काळ थांबवावा. दरम्यान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
.....
खिश्यात नाही दाणा अन बाजीराव म्हणा...
नाट्यपरिषदेकडे मदत करायला रक्कम नाही हे तेच सगळ्या जगाला सांगत होते. मग रक्कम होती तर पडद्यामागील कलावंतांना का मदत केली नाही. एक कोटी २० लाख रुपयाच्या निधीतून कोणाला मदत केली? हे देखील नाट्यपरिषद त्यांच्या संचालकांना सांगायला तयार नाही. मग खिश्यात नाही दाणा अन बाजीराव म्हणा सारखी गत असताना चक्क ४४५ संस्थांना हे कशी काय मदत करणार? असा प्रश्न बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे.
.....