अकोला - बाभूळगाव जहांगिर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या तब्बल ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्या दोन्ही शिक्षकांना शुक्रवारी उशिरा रात्री नागपुरातून अटक केली. १ एप्रिल रोजी गुन्हे दाखल झाल्यापासून ते कुटुंबियांसह फरार होते. जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींशी अश्लील भाषेत बोलणे, त्यांना बळजबरी अलिंगन देणे असे प्रकार येथील शिक्षक राजन गजभिये आणि शैलेश रामटेके हे करीत होते. विद्यार्थिनींनी या प्रकाराला विरोध केला, तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाहीत, विद्यालयातून काढून टाकू, अशा धमक्या त्यांना दिल्या जायच्या. शैक्षणिक नुकसानाच्या भीतीने विद्यार्थिनींनी हा छळ सहन केला. दरम्यान, एका विद्यार्थिनीने या प्रकरणाची तक्रार २१ मार्च रोजी विद्यालयाचे प्राचार्य आर. सिंह यांच्याकडे केली होती. त्यानंतर १0 दिवसांनी, म्हणजेच १ एप्रिल रोजी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार प्राचार्य सिंह यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली. याशिवाय २३ पालकांना सोबत घेऊन राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनीही या प्रकरणाची तक्रार त्याच दिवशी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सिव्हिल लाइन्स पोलिसांनी राजन बी. गजभिये आणि शैलेश एस. रामटेके या दोन्ही शिक्षकांविरुद्ध कलम ३५४ अ आणि पॉस्को अँक्टच्या कलम ७, ८ (लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २0१२) नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर, दोन्ही आरोपी कुटुंबियांसह फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दोन पथकं पाठवली होती. शुक्रवारी रात्री उशिरा त्यापैकी एका पथकाने दोन्ही आरोपींना नागपुरातून अटक केल्याची माहिती अकोल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली. या दोन्ही शिक्षकांवर पुणे येथील उपायुक्त एस. एस. दिवाकर यांच्या आदेशानुसार शुक्रवारीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.