“कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका”; छगन भुजबळ चांगलेच संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 01:51 PM2024-01-29T13:51:06+5:302024-01-29T13:51:16+5:30
NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal: मी एकटा नाही, ओबीसी बांधव माझ्या पाठिशी आहेत. बलंदड लोकांना ओबीसीत घुसवले जात आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी नवी मुंबई येथे शक्तिप्रदर्शन केले. यानंतर मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि विजय गुलाल उधळत मराठा बांधव परतले. यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी एक बैठकही घेतली. आमचे आरक्षण संपल्यात जमा आहे असे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी चांगलाच संपात व्यक्त केला. तुम्हाला वाटते का की, आम्ही जाणीवपूर्वक आरक्षणावर बोलत आहोत. आमच्या ओबीसीत बॅकडोअर लोक घुसवले जात आहेत. मी जाणीवपूर्वक हे केले आहे का, कोण हे करत आहे, त्याचा विचार करा. यात काय पीएचडी करायची आहे का, वाटेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत, या शब्दांत छगन भुजबळ यांनी निशाणा साधला.
कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका
ओबीसी आरक्षणाची लढाई सरकारमध्ये राहून लढणार की बाहेर पडून लढणार, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, ते माझ्या पक्षाने ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला त्याची काही चिंता नाही. ओबीसी प्रश्नाचे दु:ख आणि संताप आहे. त्यापुढे कोणतीही अभिलाषा नाही. त्यांना जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून, मी एकटा नाही. माझ्या मागे ओबीसी समाज आहे. लाखो लोक आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाष्यावर बोलताना, फडणवीस भेटतील तेव्हा त्यांना सांगेन. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या. त्यांना कशाला आमच्यात घुसवत आहात, त्यांना आरक्षण द्यायला सुरुवात झाली, हे आता थांबवा. ओबीसींचे आरक्षण जात आहे, याचे दु:ख आणि संताप आहे, अशी स्पष्ट भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
कित्येक वर्षांनी मिळणारे आरक्षण समाप्त होत आहे
चांगले घर असले तरी झोपडी दाखवली जात आहे. शिक्षण असले तरी नाही म्हणून सांगितले जात आहे. नोकरी असली तरी दाखवली जात नाही. घरासमोर गाडी ट्रॅक्टर असली तरी मोलमजुरी करता म्हणून सांगितले जात आहे, असा मोठा दावा करत, इथे मंत्रिमंडळाचा हुद्द्याचा कसलाही संबंध नाही. ओबीसी बांधवांचे, भटक्यांचे कित्येक वर्षानी मिळणारे आरक्षण समाप्त होत आहे, याची आग मनात भडकत आहे, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.
दरम्यान, आमच्यात विविध जातींचे ३५० हून अधिक वाटेकरी होते. आता हजार वाटेकरी झाले. त्यामुळे वाटा कमी होणार, हे अगदी सरळ आहे. ओबीसींच्या ५४ टक्क्यांमध्ये आणखी २०-२५ टक्के घुसवले तेही बलंदड. भटके विमुक्त जमातीतील लोक असतील किंवा इतर ओबीसी जाती असतील या सर्वांचे आरक्षण आता बलदंड लोक घेऊन जाणार. आमचे आरक्षण संपल्यात जमा आहे असे वाटत आहे. त्यामुळेच मी बोलत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.